लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण : कल्याण जवळील आंबिवलीतील एका खासगी रुग्णालयाच्या चालक आणि अन्य दोन जणांनी संगनमत करून १३ रुग्णांच्या शस्त्रक्रिया आणि औषधपचाराची बनावट कागदपत्रे तयार करून मुख्यमंत्री साहय्यता निधीतून चार लाख ७५ हजार रूपये उकळले असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.

२६ मे २०२३ ते १० जुलै २०२३ या कालावधीत मुख्यमंत्री साहय्यता निधीतून निधी लाटण्याचा प्रकार घडला आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीचे साहाय्यक संचालक देवानंद सखाराम धनावडे (५०) यांनी या फसवणूक प्रकरणी गुरुवारी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४०६, ४६५, ४६८, ४७१, ३४ या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

साहाय्यता निधी कक्षाच्या छाननीत हा निधी उकळण्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मुख्यमंत्री साहाय्यता निधी प्रशासनाकडून ठाणे आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणाची सविस्तर चौकशी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून करण्यात आली. या प्रकरणात प्रथमदर्शनी चौकशी पथकाला तथ्य आढळून आल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय साहाय्यता निधी कक्षाने घेतला. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा अहवाल आणि मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचे साहाय्यक संचालक देवानंद धनावडे यांचा अहवाल खडकपाडा पोलिसांना प्राप्त झाल्यानंतर गुरुवारी या फसवणूक प्रकरणी रुग्णालय चालक आणि अन्य दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

खडकपाडा पोलीस ठाण्यात साहाय्यक संचालक देवानंद धनावडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आंबिवली मोहने पूर्वेतील शिव निर्मल हाईट्समधील पहिल्या माळ्यावरील गणपती मल्टी स्पेशालिटीचे रुग्णालयाचे डॉ. अनुदुर्ग ढोणी (४५, रा. आंबिवली), प्रदीप बापू पाटील (४१, रा. ओम गिरीधर गौरीपाडा, कल्याण.), ईश्वर पवार (रा. धुळे) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

साहाय्यक संचालक धनावडे यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की डॉ. अनुदुर्ग ढोणी यांचे आंबिवली पूर्व येथे गणपती मल्टि स्पेशालिटी रुग्णालय आहे. मुख्यमंत्री साहाय्यता निधीकडे दाखल प्रस्तावामध्ये आंबिवली पूर्वेतील गणपती मल्टी स्पेशालिटी रुग्णालयामध्ये १३ रुग्ण दाखल आहेत. त्यांच्यावर या रुग्णालयात शस्त्रक्रिया आणि त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले आहेत, अशी बनावट कागदपत्रे गु्न्हा दाखल तीनही व्यक्तींनी तयार केली, अशी तक्रार आहे. ही कागदपत्रे खरी आहेत, असा प्रस्ताव तयार करून तो प्रस्ताव मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाकडे सादर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा प्रस्ताव कक्षाकडे दाखल झाल्यानंतर दाखल प्रस्तावाप्रमाणे मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाने डॉ. ढोणी यांच्या गणपती मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाच्या बँक खात्यावर १३ रुग्णांच्या उपचाराची चार लाख ७५ हजार रूपयांची रक्कम वर्ग केली. मुख्यमंत्री निधी कक्षातील अंतर्गत छाननीत हा सगळा प्रकार बनावट असल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री साहाय्यता निधीने पोलिसांकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर घुगे याप्रकरणाचा तपास करत आहेत.