डोंबिवली – बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा येथे कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या भूखंड क्रमांक ३४८ वर भूमाफियांंनी सात माळ्याच्या बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे.

पालिकेच्या बनावट बांधकाम परवानग्यांच्या आधारे उभारलेली साई रेसिडेन्सी ही बेकायदा येत्या १५ दिवसात भूमाफियांनी स्वताहून जमीनदोस्त करून घ्यावी, अन्यथा, भूमाफियांसहित या इमारतीचे अध्यक्ष, सचिव यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा पालिका ह प्रभागाचे साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी दिला आहे.

कुंभारखाण पाडा येथील मौजे शिवाजीनगर येथील कल्याण डोंबिवली पालिकेच्या प्राथमिक शाळेसाठी आरक्षित असलेल्या ३४८ क्रमांकाच्या भूखंडावर जमीन मालक धर्मा हेंदऱ्या पाटील, कुलमुखत्यार मृत्युंजय राय आणि गोल्डन डायमेंशन या वास्तुशिल्पकाराने बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे. ६५ बेकायदा इमारतींमध्ये गोल्डन डायमेंशनचा सहभाग आहे. या प्रकरणाची माहिती पालिकेतून मिळाल्यावर कुंभारखाण पाड्याचे रहिवासी मयूर बाळकृष्ण म्हात्रे यांनी तीन महिन्यापूर्वी पालिका आयुक्त, ह प्रभाग साहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करून पालिकेच्या आरक्षित भूखंडावरील साई रेसिडेन्सी बेकायदा इमारत उभारणाऱ्या भूमाफियांवर कारवाई करण्याची मागणी केली होती.

साहाय्यक आयुक्त राजेश सावंत यांनी इमारत उभारणाऱ्या भूमाफिया, या इमारतीमधील ५६ रहिवाशांना इमारत जमीन मालकी, पालिकेच्या बांधकाम परवानगीची कागदपत्रे सादर करण्यासाठी जुलै, ऑगस्ट २०२५ असा दोन महिन्यांचा अवधी दिला होता. या कालावधीत पालिकेने घेतलेल्या तीन सुनावण्यांमध्ये भूमाफिया, रहिवासी इमारतीची अधिकृत कागदपत्रे सादर करू शकली नाहीत.

सावंत यांनी साई रेसिडेन्सी इमारत अनधिकृत घोषित केली. येत्या १५ दिवसात ही इमारत रहिवास मुक्त करावी. अन्यथा महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमाने (एमआरटीपी) संबंधितांवर कारवाई करून ही इमारत जमीनदोस्त करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा सावंत यांनी भूमाफिया आणि रहिवाशांना दिला आहे.

या इमारतीची उभारणी एका माजी नगरसेवकाचे खासगी अंगरक्षक कुलमुखत्याधारक मृत्युंजय राय यांनी केली आहे. कुंभारखाणपाडा भागात मौज शिवाजीनगर भागात सर्वे क्रमांक ८६-२३, अ-ब वर ३४०० चौरस मीटरचा शाळेसाठी आरक्षित भूखंड आहे. या भूखंडामधील २२.१८ चौरस मीटर भाग पालिकेच्या ताब्यात आहे. मागील चार वर्षात करोना महासाथीत साई रेसिडेन्सी बेकायदा इमारतीची उभारणी करण्यात आली आहे, असे तक्रारदार मयूर म्हात्रे यांनी सांगितले.

कुंभारखाणपाडा येथील शाळेच्या आरक्षणावरील साई रेसिडेन्सी इमारत अनधिकृत घोषित केली आहे. ही इमारत स्वताहून पाडून घेण्याचे आदेश विकासक, रहिवाशांना दिले आहेत. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. – राजेश सावंत, साहाय्यक आयुक्त, ह प्रभाग.

एका खासगी अंगरक्षकाने साई रेसिडेन्सी बेकायदा इमारतीची उभारणी केली आहे. या अंगरक्षकाकडे एवढा पैसा आला कोठून. सदनिका विक्रीतून आलेला पैसा त्याने कोठे वळता केला. याप्रकरणाची आपण ईडी, प्राप्तिकर आणि आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे तक्रार करणार आहोत. ही इमारत तुटलीच पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. – मयूर म्हात्रे, तक्रारदार.