कल्याण पूर्व भागातील बेकायदा बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आडिवली, ढोकळी, पिसवली गाव हद्दीत सरकारी जमिनी, खासगी जमिनींवर पालिकेच्या कोणत्याही परवानग्या न घेता उभारण्यात येत असलेली भव्य गोदामे, बेकायदा चाळींची २० हून अधिक बांधकामे आय प्रभाग अधिकाऱ्यांनी जमीनदोस्त केली.

हेही वाचा >>>कल्याण-डोंबिवलीत जुन्या निवृत्त वेतन योजनेसाठी कर्मचाऱ्यांची निदर्शने

अचानक झालेल्या या कारवाईने भूमाफियांची पळापळ झाली. आडिवली ढोकळी भागात गोदामे आणि बेकायदा चाळी उभारण्याची कामे जोमाने सुरू असल्याची माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली. या बेकायदा बांधकामांची खात्री केल्यावर ही बांधकामे खासगी जमिनी, सरकारी जमिनीवर उभारण्यात येत आहेत. त्यांना पालिकेची परवानगी नसल्याचे समजले.

साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे तोडायची असल्याने आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे, अतिरिक्त आयुक्त मंगेश चितळे, उपायुक्त सुधाकर जगताप, उपायुक्त स्वाती देशपांडे यांना ही माहिती दिली. वरिष्ठांनी सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी अतिक्रमण नियंत्रण पथकातील कर्मचाऱ्यांना घेऊन आडिवली, ढोकळी, पिसवली गाव हद्दीत नव्याने उभारण्यात येत असलेली १५ हून अधिक बेकायदा गोदामे, चाळींची बांधकामे शुक्रवारी जमीनदोस्त केली.एकावेळी एकाच जागी एवढ्या मोठ्या प्रमाणात ही बांधकामे जमीनदोस्त केल्याने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. गेल्या काही महिन्यांपासून मुंबरकर यांनी प्रभागात जुनी, नव्याने उभारण्यात येत असलेली सर्व बेकायदा बांधकामे जमीनदोस्त करण्याची मोहीम कल्याण पूर्व भागात सुरू केली आहे. या कारवाईने परिसरातील रहिवासी समाधान व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>>डोंबिवलीत रिक्षा चालकाला ठार मारण्याच्या आरोपातून नाडर टोळीची निर्दोष मुक्तता

“बेकायदा बांधकामांच्या ठिकाणी गटार, पाणी निचऱ्यासाठी जागा नसल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. पावसाळ्यात हा त्रास अधिक वाढतो. त्यामुळे प्रभागात एकही नवीन बेकायदा बांधकाम उभे राहणार नाही याची विशेष खबरदारी घेऊन ती बांधकामे तात्काळ तोडण्यात येत आहेत. प्रदूषण करणाऱ्या काही आस्थापनांवर लवकरच घाव घालण्याचे नियोजन केले जात आहे.”-हेमा मुंबरकर,साहाय्यक आयुक्त,आय प्रभाग, कल्याण.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.