मे महिना सरून जून उजाडला की फक्त कॅलेंडरचे पान उलटत नाही. अवतीभोवतीचे सारे जीवनच बदलून जाते. पाऊस कधी आणि किती पडेल, याचा नेम नसला तरी त्यापासून बचाव करण्याची तयारी सर्वानाच करावी लागते, मग ते झाडावर काटय़ाकुटय़ांचे घरटे बांधणारे पक्षी असोत वा चार भिंतींच्या घरात राहणारी माणसे. मुसळधार पावसात गळती होऊन गैरसोय होऊ नये म्हणून बहुतेक जण आपापल्या परीने तयारी करीत असतात. घराच्या छतावरील भेगा डांबर टाकून बुजविल्या जातात. काही जण सरळ प्लास्टिकचे आवरण टाकून संभाव्य गळतीचा पुरता बंदोबस्त करतात. बाजारपेठांमधील दुकानांमधील रंगीबेरंगी छत्र्या लहानथोरांना भुरळ पाडू लागतात. सध्या ठाणे परिसरात सर्वत्र अशा प्रकारच्या पावसाळापूर्व कामांची लगबग सुरू आहे..