ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागात एका ज्येष्ठ नागरिकाला ‘तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान का करता’ असे प्रश्न करत एका तोतया कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकाऱ्याने ज्येष्ठ नागरिकाकडून दमदाटी करुन सात हजार ६०० रुपयांची लूट केली होती. गेल्या महिन्यात ही घटना घडली होती. टिळकनगर पोलिसांनी ठाकुर्ली ९० फुटी रस्ता, ठाकुर्ली रेल्वे स्थानक भागातील सीसीटीव्ही चित्रण तपासून आरोपीला उल्हासनगर येथून शिताफीने गुरुवारी अटक केली.

ठाकुर्ली भागातील एक ज्येष्ठ नागरिक निवृत्तीनंतर एका खासगी कंपनीत नोकरीला जातात. गेल्या महिन्यात रस्त्याने जात असताना ते धुम्रपान करत होते. त्यावेळी त्यांना समोरुन आलेल्या दुचाकीवरील दोन जणांनी अडविले. ‘आम्ही कल्याण डोंबिवली पालिकेचे अधिकारी आहोत. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान कसे काय करतात. कायद्याने हा गुन्हा आहे. तुम्ही कायद्याचा भंग केला आहे म्हणून तुम्ही आमच्या सोबत पोलीस ठाण्यात चला,’ असे चढ्या आवाजात बोलून ज्येष्ठ नागरिकाला घाबरविले.

‘तुम्हाला तात्काळ दंड भरावा लागेल. तुमच्या खिशात किती पैसे आहेत’ असे विचारुन ज्येष्ठ नागरिकाच्या खिशातील पाकिटातून त्यांचे बँक डेबीट कार्ड काढून घेतले. ठाकुर्ली रेल्वे स्थानका जवळील एका एटीएम केंद्रात जाऊन दोन्ही भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यामधून सात हजार ६०० रुपये काढून घेतले. आणि एटीएम केंद्राच्या बाहेर येऊन ज्येष्ठ नागरिकाला त्यांचे कार्ड परत करुन ‘तुम्ही आता आमच्या सोबत पोलीस ठाण्यात चला,’ असे म्हणून दुचाकी वरुन सुसाट वेगाने पळून गेले.

ज्येष्ठ नागरिकाने या फसवणुकी प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपींचा शोध सुरू केला होता. गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ठाकुर्ली रेल्वे स्थानक, ९० फुटी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रण तपासले. त्यात दोन जण दुचाकीवरुन आल्याचे दिसतात. पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. एका गुप्त माहितीदाराने आरोपी हे उल्हासनगर मधील रहिवासी असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांना दिली.

पोलिसांनी आरोपीचा माग काढून उल्हासनगर येथील त्याचे घर शोधले. त्याच्या घरावर पाळत ठेऊन त्याला शिताफीने अटक केली. सोमनाथ बाबुराव कांबळे (२७, रा. रमाबाई आंबेडकर नगर, उल्हासनगर) असे आरोपीचे नाव आहे. सोमनाथने आपल्या साथीदाराच्या साहाय्याने हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली. पोलिसांनी भामटयांकडून लुटीची तीन हजार ८०० रुपयांची रक्कम हस्तगत केली. या भामट्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.

साहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग पिठे प्रवीण बाकले, उपनिरीक्षक बाळासाहेब कोबरणे, हवालदार दीपक महाजन, श्याम सोनवणे, अशोक करमोडा, सफी नवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांचे आवाहन
आम्ही पोलीस किंवा पालिका अधिकारी आहोत, असे सांगून कोणी पादचाऱ्याला लुटत असेल तर त्यांनी तातडीने संबंधित इसम अधिकारी आहेत का याची तपासणी करण्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वरिषठ पोलीस निरीक्षक अजय आफळे यांनी केले आहे.