लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

ठाणे : केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या हिंसाचारावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी झाल्या असून येथील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे, असा आरोप शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी बुधवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केला. तसेच याठिकाणी सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लावावी, अशी आमच्या पक्षाची मागणी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

केंद्र सरकारने वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद पश्चिम बंगालमध्ये उमटत आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात कश्मीरमध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार होत होते. कश्मीर पंड़ितांच्या माता-भगिनींवर अत्याचार झाले. त्यांची घरे जाळली. त्यांच्या जमिनी लुटल्या. अशाचपद्धतीने पश्चिम बंगालमधील काही भागात हिंसाचार उसळला आहे. त्यात अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. शेकडो हिंदू घर सोडून गेले आहेत. धर्मिक संघर्षात आणि जाळपोळीत हिंदूंच्या १०० कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, असा दावा शिवसेना (शिंदे गट) खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे.

पश्चिम बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून हिंदूचे संरक्षण होत नसून त्या हिंसाचाराच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी झाल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्था ढासळलेली आहे. पोलिस बंदोबस्तामध्ये दुकाने आणि गाड्यांची जाळपोळ होत आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार आल्यापासून हिंदूंवर अत्याचार होत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

हुकुमशाही संपवण्यासाठी हे सरकार बरखास्त करा

हिंदूंचे संरक्षण न करता तृणमूल काँग्रेसच्या नेते चुकीची विधाने करीत आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालचे सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. ममता बॅनर्जी यांना घाबरून इंडीया आघाडीच्या नेत्यांनी पश्चिम बंगालमधील हिंसाचार आणि हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारबाबत मौन बाळगले आहे, अशी टिकाही त्यांनी केली. मुस्लिम मतांसाठी ममता बॅनर्जी या लाचार झाल्या आहेत. कायम हिंदू विरोधी भूमिका ममता बॅनर्जी सरकारने घेतली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदूंचे जगणे मुश्किल झाले असून यामुळे ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करतो. तसेच ही हुकुमशाही संपवण्यासाठी हे सरकार बरखास्त करावे, अशी आमच्या पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उद्धव ठाकरेंना आव्हान

हिंमत असेल तर हिंदूंवर अत्याचार होत आहे म्हणून ममता बॅनर्जी यांचा निषेध करावा आणि सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवटीची मागणी करावी, असे आव्हानही त्यांनी उद्धव ठाकरे यांना दिले.