अंबरनाथ : मूत्रपिंड त्रासाने ग्रासलेल्या अंबरनाथ शहरातील एका तरुणीची आणि तिच्या कुटुंबीयांची मूत्रपिंड तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली दोन लाख ९८ हजार रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमय प्रेमचंद उपाध्याय याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबरनाथ पश्चिमेतील बुवापाडा येथे राहणाऱ्या सरोजा यादव यांची मुलगी मूत्रपिंड विकारामुळे त्रस्त असल्याने उपचार घेत होती. मुंबईच्या केईम रुग्णालयात त्यांची ओळख अंबरनाथ पश्चिमेतील अमय उपाध्याय याच्यासोबत झाली होती. ओळखीच्या निमित्ताने उपाध्याय याने मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तात्काळ मूत्रपिंड उपलब्ध करून देण्याचे आमिष यादव कुटुंबीयांना दाखवले. एप्रिल आणि मे महिन्यात तरुणीच्या कुटुंबियांकडून उपाध्याय याने वेळोवेळी दोन लाख ९८ हजार रूपये घेतले.

हेही वाचा : …अशी केली जाणार चक्रीवादळातून नागरिकांची सुटका, ९ नोव्हेंबरला ठाणे जिल्ह्यात रंगीत तालीम; जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा उपक्रम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मात्र मोठा काळ गेल्यानंतरही उपाध्याय मूत्रपिंड उपलब्ध करून देत नव्हता. त्यामुळे यादव कुटुंबीयांनी त्याच्याकडे पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र पैसेही परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे यादव यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी अंबरनाथ पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानंतर सरोजा यादव यांच्या तक्रारीवरून अमय उपाध्याय याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर अशा प्रकारचे व्यवहार करताना काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते आहे.