डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील कोपर पूर्व रेल्वे स्थानक भागातील बालाजी गार्डन गृहसंकुलाच्या आवारात भटक्या श्वानांना खाऊ का घालता या विषयावरून झालेल्या बोलाचालीत या संकुलातील दोन जणांनी एका केबल व्यावसायिकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत केबल व्यावसायिकाच्या गुडघ्याचे हाड मोडले आहे. या मारहाण प्रकरणी या केबल व्यावसायिकाच्या पत्नीने रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
बालाजी गार्डन गृहसंकुलात भटक्या श्वानांच्या विषयावरून परस्पर विरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत. केबल व्यावसायिकाची पत्नी सारिका शालीक भगत यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की आपले पती शालीक भगत हे गेल्या आठवड्यात रात्री मोटारीने बालाजी गार्डन संकुलात आले. त्यांनी इमारतीखालील वाहनतळ जागेत मोटार उभी केली. ते मोटारीतून उतरून घराच्या दिशेने पायी येत होते. तेवढ्यात काही भटके श्वान मोटारीच्या दिशेने जाऊन शालीक भगत यांच्या पाठीमागून येऊ लागले. पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही अंतर चालून आल्यावर तेथे बालाजी गार्डन संकुलातील भावेश शेरेकर आणि श्रीकांत पाटील हे रात्रीच्या वेळेत मोकळ्या जागेत फिरत होते.
शालीक भगत यांच्या दिशेने येऊन भावेश आणि श्रीकांत यांनी तुम्ही या श्वानांना खाऊ घालता का, अशी विचारणा केली. त्यावेळी ते श्वान आपले नाहीत. आपण त्यांना खाऊ घालत नाही. हे श्वान आपले नाहीत याची आपण खात्री करू शकता, असे शालीक भगत यांनी सांगितले. त्यानंतर या दोघांनी शालीक भगत यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एकाने जोराने लाथ शालीक यांच्या गुडघ्याला मारली. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना असह्य वेदना सुरू झाल्या.
त्यांना तातडीने पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डाॅक्टरांनी शालीक यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात नेण्याची सूचना केली. शालीक यांना डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्या आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये शालीक यांच्या उजव्या गुडघ्याचे हाड मोडले असल्याचे निष्पन्न झाले. भावेश आणि श्रीकांंत यांनी केलेल्या मारहाणीत शालीक भगत यांना गंभीर दुखापत झाल्याने आपण ही तक्रार पोलीस ठाण्यात करत आहोत, असे सारिका भगत यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
शालीक यांच्यावर खासगी रुग्णालयात अति दक्षता विभागात उपचार सुरू आहेत. पोलीस याप्रकरणाचा तपास करत आहेत. डोंबिवली, कल्याण शहरात सोसायटीच्या आवारात येणाऱ्या भटक्या, पाळीव श्वानांवरून वाद वाढत असल्याने पोलीसही ही प्रकरणे कशी मार्गी लावायची या विषयावरून हैराण आहेत.