डोंबिवली: डोंबिवली पश्चिमेत शहराच्या मध्यवर्ति ठिकाणी सुस्थितीमधील वस्तीत राहणाऱ्या एका ७३ वर्षाच्या वृध्द महिलेला एका ६२ वर्षाच्या वृध्दाने लग्नाचे आमिष दाखविले. या महिलेचा विश्वास संपादन करून त्यांच्याशी संपर्क वाढवून त्यांच्या जवळील सोन्याचा ऐवज, रोख रक्कम अशी एकूण ५७ लाख ४० हजार रूपयांची लूट आणि फसवणूक केली आहे.
गेल्या महिन्यात हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. फसवणूक झालेल्या वृध्द महिलेच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी फसवणूक करणारा ६२ वर्षाचा वृध्द अनुज तिवारी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. या वृध्दाचा कुठलाही पत्ता, पूर्ण नाव आपणास माहिती नसल्याचे वृध्द महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, असे विष्णुनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विवेक कुमटकर यांनी सांगितले.
पोलीस ठाण्यातील प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी, की गुन्हा दाखल अनुज तिवारी (६२) यांनी वर्तमानपत्रात समवयस्क जोडीदार मिळावा म्हणून लग्नासाठी जाहिरात दिली होती. या जाहिरातीच्या माध्यमातून अनुज तिवारी हे फसवणूक झालेल्या डोंबिवलीतील महिलेच्या संपर्कात आले. फसवणूक झालेली ७३ वर्षाची महिला आणि अनुज तिवारी यांचे नियमित बोलणे सुरू झाले. त्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. या संपर्कातून अनुज तिवारी यांना वृध्द महिला ही घरात एकटीच राहत असल्याचे निदर्शनास आले. अनुज यांनी या महिलेचा विश्वास संपादन केला. आपण दोघेही एकत्रित पुणे येथे घर घेऊन राहू असे आश्वासन त्या एकल वृध्द महिलेला दिले.
आपणास चांगला जोडीदार मिळतो असा विचार करून फसवणूक झालेल्या महिलेने अनुज यांच्यावर विश्वास ठेवला. अनुज पीडित महिलेच्या डोंबिवलीतील घरी येऊन राहू लागले. आपण लग्न करून एकत्र राहू असा खात्रीलायक विश्वास अनुज यांंच्याकडून मिळाल्याने पीडित महिलेने त्यांच्याबरोबर त्यांच्या मागणीप्रमाणे आर्थिक व्यवहार सुरू केले. अनुज यांनी वृध्देला पुणे येथील घर खरेदीसाठी वृध्देकडून ३५ लाख रूपये टप्प्याने काढून घेतले. घर खरेदीच्या बनावट पावत्या वृध्देला दाखविल्या. ही वृध्द महिला एकटीच असल्याने या महिलेला लुटण्याचा विचार अनुज तिवारी यांच्या मनात डोकावू लागला. वृध्देच्या डोंबिवलीतील घरात राहत असताना अनुज तिवारी यांनी त्यांच्या घरातील कपाटातील २० तोळ्याचे सोन्याचे दागिने वृध्देच्या नकळत चोरले. त्यांचे डेबिट कार्ड चोरून त्या माध्यमातून बँकेतून दोन लाख ४० हजार रूपयांची रक्कम काढून घेतली. असा एकूण ५७ लाख ४० हजार रूपयांचा भरभक्कम ऐवज ताब्यात आल्यानंतर अनुज यांनी वृध्द महिलेला संपर्क करणे टाळण्यास सुरूवात केली. वृध्द महिलेला अनुज यांच्याकडून प्रतिसाद मिळणे बंद झाल्यावर त्यांनी घरातील ऐवजाची तपासणी केली तर कपाटातील सोन्याचा ऐवज गायब होता.
आपणास लग्नाचे, एकत्रित राहण्याचे आमिष दाखवून आपला विश्वासघात करून अनुज तिवारी यांनी आपल्या घरात चोरी आणि फसवणूक केली म्हणून वृध्देने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रकरणाचा तपास सुरू आहे.