डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रस्त्या लगतच्या सर्वाधिक वर्दळीच्या गांधीनगर रस्त्यावर जुना जकात नाका भागात भूमाफियांनी पदपथ, नाल्याला अडथळा होईल आणि रस्तारुंदीकरणाला बाधा येईल अशा पध्दतीने पाच गाळ्यांची उभारणी केली आहे. या बेकायदा बांधकामांची पाहणी करून ग प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त संजय कुमावत यांनी संबंधित गाळेधारकांना बांधकाम परवानगी आणि जमीन मालकीची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

दोन वर्षापूर्वी या पाच गाळ्यांमधील दोन गाळे भूमाफियांनी बांधले होते. हळूहळू या बेकायदा बांधकामांकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही असे समजून भूमाफियांनी या गाळ्यांची संख्या पाच केली आहे. एका वर्षात दोन ते तीन गाळे या भागात बांधले जात असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. मानपाडा छेद रस्त्यावरील गांधीनगर जुना जकात नाका भागात हे बेकायदा गाळे बांधण्यात आले आहेत. या गाळ्यांना रंग देऊन तात्काळ तेथे दुकाने सुरू करण्याची तयारी भूमाफियांनी तयार केली आहे. पालिका अधिकारी निवडणूक कामात व्यस्त आहेत, याचा गैरफायदा घेत माफियांनी या गाळ्यांमधील जागा व्यावसायिकांना भाड्याने, मालकी हक्काने विकून गाळ्यांचा वापर सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

हेही वाचा…घोडबंदरकरांची अवजड वाहतूकीच्या कोंडीतून सुटका? पुल कामासाठी अतिअवजड मालवाहू वाहनांना बंदी

अनेक वर्ष मोकळ्या असलेल्या जागेत भूमाफियांनी बेकायदा गाळे उभारल्याने परिसरातील रहिवासी आश्चर्य व्यक्त करत आहेत. या गाळ्यांच्या बाजूला नाला, मुख्य वर्दळीचा रस्ता आहे. येत्या काळात नाल्याची बांधणी करताना, रस्ता रुंदीकरण करताना हे बेकायदा गाळे अडथळे ठरणार आहेत, असे या प्रकरणातील तक्रारदार महेश निंबाळकर यांनी सांगितले. अनेक नागरिकांनी याप्रकरणी पालिकेत तक्रारी करून हे बेकायदा जमीनदोस्त करा, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा…Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून कोणीही कुठलीही ऑफर दिलेली नाही- संजीव नाईक यांनी दिले स्पष्टीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गांधीनगर रस्त्यावरील बेकायदा गाळे जुने आहेत. त्यांना रंग लावून ती विकण्याची तयारी करण्यात येत आहे. या गाळ्यांच्या धारकांना नोटिसा बजावल्या आहेत. विहित प्रक्रिया पार पडली. हे गाळे बेकायदा असल्याचे निष्पन्न झाले की ते वरिष्ठांच्या आदेशाने आचारसंहितेचा विचार करून जमीनदोस्त केले जातील. -संजय कुमावत,साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.