डोंबिवली – सात वर्ष पाठपुरावा करूनही मला रस्ते, गटार कामांसाठी निधी मिळाला नाही. माझ्या प्रभागाकडे कोणी लक्ष दिले नाही. मात्र, मी भाजपचा राजीनामा दिल्यानंतर सात वर्षानंतर घाईघाईने माझ्या गरीबाचावाडा प्रभागातील रस्ते कामे आता भाजपने मार्गी लावण्याचा निर्धार केला आहे. माझ्या राजीनाम्यामुळे गरीबाचावाडा प्रभागातील कामे तरी मार्गी लागली. त्यामुळे धन्यवाद भाजप…ही कामे अशीच पुढे वेगाने पूर्ण होतील याकडेही लक्ष द्या, असा सूचक सल्ला डोंबिवली पश्चिमेतील गरीबाचावाडा प्रभागातील शिंदे शिवसेना आणि भाजपच्या उंबरठ्यावर असलेले माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिला.
भाजपचे गरीबाचावाडा प्रभागातील ज्येष्ठ माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपचे वरिष्ठ, स्थानिक नेते आपल्याकडे विकास कामे मार्गी लावण्यासाठी लक्ष देत नाहीत या कारणावरून भाजप सदस्यत्वाचा सपत्नीक राजीनामा दिला आहे. विकास म्हात्रे यांच्या गरीबाचावाडा, राजूनगर प्रभागात कोट्यवधी रूपयांचा निधी विकास कामांसाठी देऊनही ते सतत राजीनाम्याचे हत्यार उपसत असल्याने भाजप नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते नाराज आहेत. गेल्या काही महिन्यांपासून आगामी पालिका निवडणुकींचा विचार करून विकास म्हात्रे शिंदे शिवसेनेच्या गळाला लागले असल्याची चर्चा आहे.
कोट्यवधीचा निधी देऊनही विकास म्हात्रे भाजप सोडत असल्याने त्यांना भाजपची ताकद दाखवून देण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी विकास म्हात्रे यांच्या गरीबाचावाडा प्रभागातील रखडलेल्या सिमेंट रस्ते कामांचा शुभारंभ रविवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत केला. वीर जिजामाता रस्ता, पेट्रोल पंप ते खंडोबा मंदिर, तसेच दत्तमंदिर ते श्रीधर म्हात्रे चौक, गणेश रस्त्यांचे रूंदीकरण आणि काँक्रिटीकरण केले जाणार आहे.
या शुभारंभ कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, माजी नगरसेवक नंदू म्हात्रे, पप्पू भोईर, विकासक प्रकाश जोशी, बाळा पाटील, प्रशांत पटेकर, विजय भोईर, अनिल भोईर, योगेश भोईर, विजय शिंदे, मंडल अध्यक्षा प्रिया जोशी उपस्थित होते.
विकास म्हात्रे गणेशनगर मधील आपल्या जनसंपर्क कार्यालयाजवळ आले. त्यावेळी त्यांची समोरासमोर गाठ जिल्हाध्यक्ष परब यांच्या बरोबर पडली. विकास म्हात्रे यांनी भाजपचे परब यांना उद्देशून धन्यावाद, गेल्या सात वर्षात माझ्या प्रभागातील रस्ते कामे मार्गी लागावीत म्हणून मी प्रयत्न केले. ती झाली नाहीत. मी भाजपचा राजीनामा दिल्या बरोबर ही कामे तात्काळ मार्गी लागली. मरा छान वाटले. ही कामे अशीच लवकर पूर्ण करा. माझ्या प्रभागाची प्रगती करा, अशी उपरोधिक टिपणी भाजपला उद्देशून केली.
जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी सांगितले, विकास म्हात्रे यांनी राजीनामा दिला असला तरी तो भाजपने मंजूर केला नव्हता. विकास म्हात्रे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर भेट घालून देण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या नागरी समस्या मार्गी लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर आपण भाजपमध्ये समाधानी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. विकास म्हात्रे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे भाजपने त्यांच्या प्रभागात विकास कामे सुरू केली आहेत.
