लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली: पावसाळा पूर्वीची देखभाल म्हणून महावितरणच्या जिवंत वीज वाहिनींना लागलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याचे काम महावितरण कामगारांकडून डोंबिवली शहराच्या विविध भागात सुरू आहे. या तोडलेल्या झाडांच्या फांद्या अनेक ठिकाणी मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर, लगतच्या नाल्यांमध्ये तोडकाम कामगारांकडून टाकण्यात येत असल्याने परिसरातील रहिवासी नाराजी व्यक्त करत आहेत.

कडक उन्हामुळे नाल्यांमधील सांडपाण्याचे प्रवाह आटले आहेत. नाल्यांमध्ये वाहते पाणी नसल्याने नाल्यांमध्ये गाळ, कचरा जागोजागी भरुन राहिला आहे. रात्रीच्या वेळेत नाल्यांमधील कुजलेला कचरा, त्यामधील घाणीची खूप दुर्गंधी परिसरात पसरते. रहिवाशांना त्याचा त्रास रात्रभर होतो. डोंबिवली पश्चिमेत भरत भोईर नाला, नांदिवली नाला, कल्याणमध्ये लोकग्राम नाला, जरीमरी नाला आणि शहराच्या विविध भागातील नाले कचऱ्याने भरुन गेले आहेत.

हेही वाचा… येऊरचे प्रवेशद्वार आता सायंकाळी ७ वाजताच बंद, रात्रीच्या पार्ट्यांना चाप बसण्याची शक्यता

आता महावितरणचे कामगार झाडे तोडल्यानंतर झाडांच्या फांद्या नाल्यांमध्ये टाकतात. यामुळे पालापाचोळा नाल्यात कुजतो. झाडाच्या फांद्या कुजून त्या नाल्यातील वाहत्या पाण्याला अडथळा ठरत आहेत. नालेसफाईची कामे करताना पालिका ठेकेदाराला नाल्यातून या कुजलेल्या झाडांच्या फांद्या बाहेर काढताना त्रास होणार आहे. नालेसफाईची कामे करताना वर्षानुवर्ष पालिका ठेकेदार आयुक्त, अधिकाऱ्यांना दिसेल अशा भागातील नालेसफाई करतात. पाऊस सुरू झाला की पुन्हा नाले सफाईच्या कामाकडे कोणी पाहत नाही. त्यामुळे बहुतांशी नाले कचरा, गाळाने भरलेले असतात. मुसळधार पाऊस सुरू झाला की त्याचा त्रास परिसरातील रहिवाशांना होतो, असे एका रहिवाशाने सांगितले.

हेही वाचा… कल्याण डोंबिवली पालिकेतील नस्ती गायब प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करणार

महावितरणकडून कल्याण, डोंबिवलीत पावसाळापूर्वी जिवंत वीज वाहिन्यांना लागलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे सुरू आहेत. ही कामे करताना महावितरणने पालिका घनकचरा विभागाला माहिती दिली तर रस्तोरस्ती पडलेल्या फांद्या तात्काळ उचलणे शक्य होणार आहे. यामुळे तोडलेल्या झाडांच्या फांद्यांचा पाला रस्त्यावर पडून तेथे घाण होणार नाही. पालिका सफाई कामगार, आरोग्य सेवेचे कर्मचारी कचराकुंडीच्या ठिकाणी पडलेला कचरा उचलून घेऊन जातात. ते पदपथ, रस्त्याच्या कोपऱ्यांवर टाकलेल्या फांद्यांना हात लावत नाहीत.

रहिवासी या फांद्या उचलून कोठे टाकू शकत नाहीत. त्यामुळे तोडलेल्या फांद्या तात्काळ उचलण्यासाठी महावितरण आणि पालिका घनकचरा विभागाने समन्वयाने काम करावे, अशी मागणी शिवसेनेचे डोंबिवलीतील युवा पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे. डोंबिवली, कल्याणमध्ये नाले, गटारे बुजवून बेकायदा बांधकामे केली जात आहेत. जागोजागी पाण्याचे प्रवाह अडून अनेक भागात दुर्गंधी पसरत आहे. खाडीला मिळणारे आयरे, मोठागाव, कोपर, गरीबाचापाडा, देवीचापाडा भागातील बहुतांशी नाले, गटारे बांधकामांसाठी बुजविण्यात आले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ महावितरणने झाडांच्या फांद्या तोडताना पालिकेचे सहकार्य घेतले तर तोडलेल्या फांद्या तात्काळ उचलून नेऊन त्या कचराभूमीवर टाकता येतील. आता महावितरणने फांद्या तोडल्या की त्या अनेक दिवस रस्त्यावर पडून राहतात. यासाठी महावितरण, पालिकेने शहर स्वच्छेतेसाठी समन्वयाने काम करावे.” – अनमोल म्हात्रे, शिवसेना युवा पदाधिकारी, डोंबिवली.