डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील पालिकेच्या फ प्रभाग हद्दीत ९० फुटी रस्ता, चोळे, खंबाळपाडा, भोईरवाडी या भागात मागील दोन ते तीन वर्षापासून चारचाकी, दुचाकी, तीन चाके वाहने रस्ते, पदपथ अडवून उभी करण्यात आली होती. या भंगार वाहनांमुळे वाहतुकीला अडथळा येत होता. या वाहनांमुळे या भागातील सकाळच्या वेळेतील स्वच्छता करता येत नव्हती. या सर्व गोष्टींचा विचार करून फ प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आवश्यक प्रक्रिया पार पाडून ही सर्व बेवारस भंगार वाहने अतिक्रण नियंत्रण पथकाच्या साहाय्याने उचलण्याची शुक्रवारी कारवाई केली.

या बेवारस म्हणून उभ्या असलेल्या वाहनांवर धुळीचे दोन ते तीन इंचाचे थर साचले होते. मागील दोन ते तीन वर्षापासून ही वाहने एकाच जागी उभी आहेत. त्यामुळे वाहनांखाली स्वच्छता पालिका सफाई कामगारांना करता येत नव्हती. डोंबिवली, कल्याण शहरातील वाढती वाहन संख्या, विविध रस्त्यांवर नियमित होणारी कोंडी विचारात घेऊन खंबाळपाडा, चोळे, ठाकुर्ली भागातील अनेक नागरिकांनी आपल्या घर परिसरातील बेवारस स्थितीत असलेली भंगार वाहने उचलण्याची मागणी पालिकेकडे केली होती.

काही वाहने पदपथ अडवून उभी करून ठेवण्यात आली होती. ही वाहने वाहतुकीला अडथळा येत असल्याचे निदर्शनास आल्यावर साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी ही बेवारस भंगार वाहने उभी असल्याच्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरात ही वाहने कोणाच्या मालकीची आहेत याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परिसरातील कोणीही या वाहनांवर आपला मालकी हक्क सांगितला नाही.

त्यामुळे शुक्रवारी सकाळी हायड्रा मशिनच्या साहाय्याने खंबाळपाडा, ठाकुर्ली, ९० फुटी रस्ता, चोळे भागातील धूळखात पडलेल्या मोटारी, रिक्षा, दुचाकी वाहने एका ट्रकमध्ये भरून खंबाळपाडा येथील पालिकेच्या भंगार वाहन केंद्रावर नेऊन जमा केली. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या वाहनांखाली बराच कचरा जमा झाला होता. तो घनकचरा विभागाच्या कामगारांना बोलावून तात्काळ काढून टाकण्यात आला आणि वाहने उभी असलेल्या जागा स्वच्छ करण्यात आल्या.

अशीच कारवाई फ प्रभागाने पेंडसेनगर, सारस्वत काॅलनी, टिळकनगर, टिळक रस्ता, चार रस्ता, मानपाडा रस्ता डावी बाजू भागात राबविण्याची मागणी नागरिक करत आहेत.

फ प्रभाग हद्दीत मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि बेवारस भंगार स्थितीत असलेली वाहने पाहणीची मोहीम सुरू केली आहे. अशाप्रकारची वाहने कोणाच्या मालकीची आहेत का हे तपासून मग ही वाहने उचलण्याची कार्यवाही केली जाणार आहे. खंबाळपाडा भागातून अशी वाहने उचलण्यात आली. – हेमा मुंबरकर, साहाय्यक आयुक्त, फ प्रभाग, डोंबिवली.