डोंबिवली: कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे कठोर आदेश पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी प्रभाग साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. साहाय्यक आयुक्त, फेरीवाला हटाव पथकांकडून फेरीवाल्यांवर कठोर कारवाई होते की नाही हे पाहण्यासाठी अतिक्रमण नियंत्रक उपायुक्त अवधूत तावडे हे नियमित डोंबिवलीत फेऱ्या मारत असल्याने रेल्वे स्थानक परिसरात गेल्या आठवड्यापासून एकही फेरीवाला दिसत नाही.

उपायुक्त अवधूत तावडे हे डोंबिवलीतील प्रभाग साहाय्यक आयुक्तांना पूर्वसूचना न देता अचानक डोंबिवली रेल्वे स्थानक भागात फेरफटका मारून फेरीवाल्यांवर कारवाई होते का याची पाहणी करत आहेत. उपायुक्तांच्या दौऱ्यामुळे फ, ग आणि ह प्रभागातील फेरीवाला हटाव पथके सक्रिय झाली आहेत. आयुक्त डाॅ. जाखड यांनी पदभार स्वीकारल्यापासून रेल्वे स्थानक भागात एकही फेरीवाला दिसता कामा नये, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत. आयुक्त जाखड यांच्या शिस्तप्रिय कार्यपध्दतीमुळे कारवाईचा बडगा नको म्हणून आता प्रभागातील अधिकारी, फेरीवाला हटाव पथके तत्परतेने फेरीवाल्यांवर कारवाई करत आहेत.

हेही वाचा… विदेशी चलनाचे आमिष दाखवून केले पाच लाख लंपास

गेल्या आठवड्यात एका जागरूक नागरिकाने आयुक्त जाखड यांना डोंंबिवली पूर्व फडके रोड भागात फेरीवाले बसले असल्याची दृश्यचित्रफित पाठविली होती. आयुक्तांंनी त्याची गंभीर दखल घेऊन दुसऱ्या दिवशी उपायुक्त तावडे यांना डोंबिवलीत पाठवून या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्त जाखड अचानक रेल्वे स्थानक भागात पाहणी करतात याचीही भिती अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे रेल्वे स्थानक भागात फेरीवाले दिसणार नाही याची काळजी अधिकारी घेत आहेत. कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात क प्रभाग कार्यालयाकडून फेरीवाल्यांवर नियमित कारवाई केली जात असल्याने दीपक हाॅटेल ते महमदअली चौक ते शिवाजी चौक रस्ते फेरीवाला मुक्त झाले आहेत. डोंबिवली पश्चिमेतील व्दारका हाॅटेलजवळील शिव वडापावची हातगाडी विष्णुनगर मासळी बाजाराजवळ आणून ठेवण्यात आली आहे. ह प्रभाग हद्दीतील वर्दळीच्या रस्त्यावरील व्यापाऱ्यांनी बहुतांशी पदपथ सामान ठेऊन, पावसाळी निवारे बांधून अडून ठेवले आहेत.