डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसी भागातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील (घरडा सर्कल) येथील एका कॅफेमधील कामगार मनसे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी वेळोवेळी बेताल वक्तव्य करत होता. तसेच, या दुकानातील इतर मराठी कामगारांना त्रास देत आहे. याविषयीची माहिती मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना मिळाली होती.

मनसे पदाधिकाऱ्यांनी गणेशोत्सव सुरू आहे. वाद नको म्हणून समंजसपणे कॅफेत जाऊन दुकानातील क्षेत्रीय व्यवस्थापकाला समजावले. संबंधित कामगाराला कामावरून काढून टाका आणि तो पुन्हा या दुकानात दिसणार नाही, असा इशाराही दिला. कॅफे व्यवस्थापनाने ही मागणी तात्काळ मान्य केली.

तसेच, या कॅफेमध्ये अनेक मराठी मुले काम करतात. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये, असे समंजसपणे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कॅफे क्षेत्रीय व्यवस्थापकाला सांगितले. डोंबिवली पूर्वेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (घरडा सर्कल) येथे एक कॅफे आहे. या कॅफेतील आशुतोष गिरी हा कामगार नेहमीच मनसे, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी असंबध्द, बेताल अशी वक्तव्य करत असतो. तसेच, तो कॅफेमधील मराठी तरूणांना त्रास देत आहे अशा वाढत्या तक्रारी मनसेचे डोंबिवली तक्रार विभाग अध्यक्ष संजय चव्हाण यांच्याकडे आल्या होत्या.

अध्यक्ष चव्हाण यांंनी संबंधित कॅफे चालकाशी मोबाईलवरून संभाषण केले. हा विषय या संभाषणातून संपला होता. त्यानंतर कामगार गिरी याने मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या विषयी बेताल वक्तव्य केले. त्यामुळे मनसेचे विधानसभा सचिव अरूण जांभळे, शहर संघटक हरीश पाटील, विभाग अध्यक्ष संजय चव्हाण, रक्षीत गायकर, विभाग सचिव अजय घोरपडे उपविभाग अध्यक्ष अनिल दाभाडे संतप्त झाले.

अतिशय समंजसपणे सांगुनही दुकानातील गिरी नावाचा कामगार मुजोरी करत असेल तर त्याला मनसे पध्दतीने धडा शिकविण्याचा निर्णय मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी घेतला. त्यांनी शुक्रवारी घरडा चौक येथे जाऊन संबंधित कॅफे मालकाला गिरीची मुजोरी, आपल्या नेत्याविषयी तो जर बेताल वक्तव्य करत असेल तर त्याला दुकानात जाऊनच मनसे पध्दतीने धडा शिकविण्याचा निर्णय घेतला.

मनसेचे स्थानिक पदाधिकारी जांभळे, पाटील आणि इतर सहकारी कॅफेमध्ये येत आहेत. हे समजताच कॅफेमध्ये कर्तव्यावर असलेला आशुतोष गिरी आता आपले काही खरे नाही असा विचार करून दुकानातून पळून गेला. तोपर्यंत मनसेचे पदाधिकारी कॅफेमध्ये धडकले. कॅफेमध्ये आल्यावर गिरी कोण, असा प्रश्न मनसे पदाधिकाऱ्यांनी केला. तो तेथे नव्हता. अरूण जांभळे यांनी कॅफेच्या क्षेत्रिय व्यवस्थापकाला बोलावून घेतले आणि गणेशोत्सव सुरू आहे. उत्सवी दिवस आहेत. त्यामुळे तुम्ही आम्हाला उगाच डिवचू नका. अन्यथा आम्ही मनसे पध्दतीने याठिकाणी हव ते करू शकतो, असा सज्जड दम कॅफे व्यवस्थापनाला दिला. याठिकाणी राज ठाकरे यांच्याविषयी बेताल वक्तव्य करणारा गिरी कामगार याठिकाणी दिसता कामा, असे सांगितले.