डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिम भाग पादचारी पुलाने जोडणारा नेहरू रस्त्यावरील श्री गणेश मंदिराजवळील पादचारी पूल धोकादायक झाला आहे. त्यामुळे येत्या १ एप्रिलपासून दुरुस्तीच्या कामासाठी हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. डोंबिवलीतील शेकडो नागरिक दररोज या पादचारी पुलावरून पूर्व, पश्चिम भागात जातात.

मध्य रेल्वेतर्फे रेल्वे मार्गावरून गेलेल्या अनेक रेल्वे उड्डाण, पादचारी पुलांचे यापूर्वीच सर्वेक्षण करण्यात आले आहे. या पुलांमध्ये डोंबिवलीतील नेहरू मैदानाजवळील गणेश मंदिर ते डोंबिवली पश्चिमेला भावे सभागृहाजवळ जाण्यासाठी सुयोग्य असलेला पादचारी पूल धोकादायक असल्याचा अहवाल मुंबईतील पवई येथील भारतीय प्राद्योगिक संस्थेच्या संरचनात्मक अभियंता विभागाने मध्य रेल्वे प्रशासनाला अहवाल दिला आहे.

हेही वाचा : ठाणे : राजन विचारे यांचा प्रचार सुरू

रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने डोंबिवलीतील पादचारी पुलाची पाहणी केली, त्यावेळी हा पूल पादचाऱ्यांना नियमित येजा करण्यासाठी सोयीस्कर नसल्याचे आणि पूल धोकादायक असल्याचे रेल्वे अभियंत्यांच्या निदर्शनास आले. रेल्वेच्या वरिष्ठांच्या आदेशावरून तातडीने या पुलाची देखभाल दुरूस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. येत्या १ एप्रिलपासून पादचारी पूल नागरिकांना येजा करण्यासाठी बंद करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा : डोंबिवलीतील नांदिवलीत वर्दळीच्या रस्त्यात बेकायदा गाळ्याचे बांधकाम; शाळा, व्यापारी संकुलांच्या वाहनांना अडथळा

प्रवाशांना वळसा

डोंबिवली पूर्व, पश्चिमेतील अनेक नागरिक बाजारातील खरेदी, गणेश मंदिरात येण्यासाठी, शाळेत जाण्यासाठी नेहरू रस्त्यावरील रेल्वे मार्गावरील पादचारी पुलाचा अवलंब करत होते. या पुलामुळे रेल्वे स्थानकाकडे जाण्याचा तेथील गर्दीतून वाट काढत इच्छित स्थळी जाण्याचा नागरिकांचा त्रास वाचत होता. हा पूल बंद होणार असल्याने नागरिकांना डोंबिवली रेल्वे स्थानकातून किंवा ठाकुर्ली रेल्वे उड्डाण पुलावरून डोंबिवली पूर्व, पश्चिम भागात पायी जावे लागणार आहे. डोंबिवली पूर्वेतील स. वा. जोशी शाळेतील अनेक विद्यार्थी आपल्या पालकांसह या पादचारी पुलावरून येजा करत होते. मुलांनाही आता वळसा घेऊन शाळेत जावे लागणार आहे. ज्येष्ठ नागरिक, वृध्द डोंबिवली रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी गणपती मंदिराजवळील पुलावरून इच्छित स्थळी जात होते.