डोंबिवली : मध्य रेल्वेच्या दिवा-कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान एका पोलिसाचा बुधवारी लोकलमधून पडून मृत्यू झाला. लोकलचा डबा प्रवाशांनी खच्चून भरला असल्याने मयत पोलीस लोकलच्या डब्याच्या दरवाजाला लटकून प्रवास करत होता. कोपर रेल्वे स्थानकानंतर लोकलने वेग घेताच पोलिसाचा तोल गेला आणि तो रेल्वे मार्गात पडून मरण पावला.

रोहित रमेश किळजे (२५) असे मयत पोलिसाचे नाव आहे. तो डोंबिवलीत राहत होता. मुंबईतील ताडदेव पोलीस मुख्यालयात तो कर्तव्यावर होता. हवालदार रोहित बुधवारी सकाळी कर्तव्यावर जाण्यासाठी निघाले होते. डोंबिवली रेल्वे स्थानकात त्यांनी सकाळची लोकल पकडली. पण लोकलचा डबा प्रवाशांनी खच्चून भरला होता.

हेही वाचा : “…तर सामूहिक राजीनामे देणार”, काँग्रेसचा इशारा; उमेदवार निश्चितीपूर्वीच महाविकास आघाडीत दुही

लोकल अतिजलद असल्याने रोहित यांनी डब्यात जागा नसली तरी लोकलच्या दरवाजाला पकडून प्रवास सुरू केला. कोपर रेल्वे स्थानकानंतर लोकलने वेग घेताच रोहितने दरवाजाच्या कडीला पकडलेला हात त्याचा तोल सांभाळू शकला नाही. प्रवाशांचा भार अंगावर येऊ लागल्याने रोहितचा दरवाजाच्या दांडीचा हात निसटला आणि तो रेल्वे मार्गात पडून जागीच मरण पावला. दिवा ते कोपर रेल्वे स्थानकांच्या दरम्यान गेल्या वर्षभरात सुमारे ५०० हून अधिक मृत्यू झाले आहेत.