डोंबिवली – रिक्षा संघटना, प्रवासी संघटना यांच्या कोणत्याही मतांचा विचार न करता कल्याण येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने डोंबिवलीत सोमवारी सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न केला. हा सर्वे कोणतेही नियोजन नसलेला, प्रवासी हिताचा नसल्याने डोंबिवलीतील प्रमुख रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या सर्वेक्षणाकडे पाठ फिरवून निषेध नोंदवला.
या सर्वेक्षण पथकात उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, वाहतूक अधिकारी, प्रवासी संघटनांचे पदाधिकारी, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांचा समावेश असणे आवश्यक होते. कल्याण डोंबिवली पालिकेतर्फे ह प्रभाग कार्यालयातील फेरीवाला हटाव पथकातील वाहन चालक अजित ब्रह्मदंडे या सर्वेक्षणात सहभागी झाले होते. या सर्वेक्षणात पालिकेचा मालमत्ता विभाग, साहाय्यक आयुक्त दर्जाचा अधिकारी सहभागी होणे आवश्यक होते. शहरातील रिक्षा वाहनतळांविषयी पालिका किती बेफिकीर आहे हेही स्पष्ट होते, असे डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे कार्याध्यक्ष दत्ता माळेकर यांनी सांगितले.
डोंबिवलीतील रिक्षा वाहनतळ निश्चितीसाठी २०१७ पर्यंत सात ते आठ वेळा सर्वे झाला. डोंबिवली शहराच्या नागरीकरण झालेल्या विस्तारित भागाचा विचार करून त्या ठिकाणचा सर्वे होणे आवश्यक होते. त्याचा कोणताही विचार या सर्वेक्षणाच्यावेळी करण्यात आला नाही. सर्वेक्षणासाठी मीटर असलेली रिक्षा गरजेची असते. या रिक्षेने रेल्वे स्थानक ते इच्छित स्थळापर्यंत मीटरचे किती युनिट पडतात. त्याप्रमाणे भाडे दर निश्चित करणे आवश्यक होते. शेअरने या भागात किती भाडे पडते. असा कोणताही प्रकार न करता आरटीओ अधिकाऱ्यांनी मनमानी पध्दतीने सर्वेक्षण केले.
कोणतेही नियोजन नसलेल्या या सर्वेक्षणात डोंबिवलीतील डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटनेचे दत्ता माळेकर, उपाध्यक्ष नंदू परब, रिक्षा चालक मालक संघटनेचे अंकुश म्हात्रे, शेखर जोशी, भिकाजी झाडे, लाल बावटा रिक्षा संघटनेचे काळू कोमास्कर सहभागी झाले नाहीत. आरटीओने महानगर परिवहन प्राधिकरणाचा हवाला देत तीन ते पाच रूपये भाडे जाहीर करून रिक्षा संघटना, प्रवासी यांच्यात संभ्रम निर्माण केला आहे, असे माळेकर यांनी सांगितले.
या सर्वेक्षणात आरटीओचे मोटार वाहन निरीक्षक नीलेश अहिरे, बालाजी बोंदरवाड, प्रसाद खारगे, वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील, पालिकेतर्फे फेरीवाला हटाव पथकातील वाहन चालक अजित ब्रह्मदंडे सहभागी झाले होते. या सर्वेक्षण पथकात पालिकेकडून ब्रह्मदंडे वाहन चालक कसे सहभागी झाले याची चौकशी करण्याची मागणी आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडे करण्यात येणार आहे.
रिक्षा, प्रवासी संघटना यांना विचारात घेऊनच रिक्षा वाहनतळ, भाडे निश्चितीसाठी डोंबिवलीत सर्वेक्षण केले जात आहे. योग्य नियोजन करून हे सर्वेक्षण केले जात आहे. – आशुतोष बारकुळ, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
डोंबिवलीतील रिक्षा वाहनतळ निश्चित करणे, भाडे निश्चित करताना रिक्षा चालकांचे आर्थिक नुकसान होता कामा नये आणि प्रवाशांवरही भाडे वाढीचा बोजा पडता कामा नये, असे रिक्षा संघटनांचे म्हणणे आहे. आरटीओने मनमानी पध्दतीने सर्वेक्षण केल्याने या सर्वेक्षणावर प्रमुख रिक्षा संघटनांनी बहिष्कार टाकला. – दत्ता माळेकर, कार्याध्यक्ष, डोंबिवली रिक्षा चालक मालक संघटना.