डोंबिवली : आपल्या सुखदुखात सदासर्वकाळ धाऊन येणारा, भेटीची वेळ न घेता भेट देऊ शकणारा आणि आपल्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध राहणाऱ्या राजेश मोरे यांच्यासारख्या उमेदवाराला भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, असे आवाहन शिवसेना खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांनी शनिवारी येथे केले.

कल्याण ग्रामीणचे महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केलेल्या भाषणात खा. शिंदे यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांचा नामोल्लेख टाळून त्यांना टिकेचे लक्ष्य केले. कल्याण ग्रामीणमधील महायुतीचे उमेदवार शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे सामान्य शिवसैनिक आहेत. त्यांना सामान्यांच्या नागरी समस्या, तक्रारींची जाणीव आहे. त्यामुळे आपणास ते भेटीची वेळ न घेता २४ तास उपलब्ध राहू शकतात. आपल्या सुखदुखात धाऊन येणाऱ्या लोकप्रतिनिधीची आता गरज आहे, अशी टोलेबाजी खा. डाॅ. शिंदे यांनी करून अप्रत्यक्षरित्या मनसेचे उमेदवार राजू पाटील यांना लक्ष्य केले.

हेही वाचा :“आवडत असेल किंवा नसेल महायुतीचा धर्म पाळून सुलभा गणपत गायकवाड यांचा प्रचार करा !”, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे वक्तव्य

राजेश मोरे यांच्या सारख्या सामान्य शिवसैनिकाला उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. राजा का बेटा राजा नाही बनेगा, असे सांगत शिंदे शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्यालाही न्याय दिला जातो, असे खा. डाॅ. शिंदे यांनी सांंगितले. महायुतीचे सर्व कार्यकर्ते कल्याण लोकसभा मतदारसंघात जोमाने कामाला लागले आहेत. या मतदारसंघातील महायुतीचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास खा. डाॅ. शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे आपणास उमेदवारी मिळाली. कल्याण ग्रामीणचा गड दोन वेळा शिवसेनेच्या हातून गेला असला तरी तो आता आपल्याला पुन्हा मिळवायचा आहे. यासाठी प्रत्येकाने कठोर मेहनत करा, असे आवाहन उमेदवार राजेश मोरे यांनी केले.

हेही वाचा :मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या बंडखोराला दोन ते तीन कोटी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी शिवसेना जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख महेश पाटील, राष्ट्रवादीचे ॲड. बह्मा माळी, महिला आघाडीच्या लता पाटील, माजी नगरसेवक जालिंदर पाटील, गुलाब वझे, भाजपचे ग्रामीण प्रमुख नंदू परब उपस्थित होते.