डोंबिवली : डोंबिवली पूर्वेतील ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळील एका सोसायटीत ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सलटिंग नावाने एजन्सी सुरू करून या माध्यमातून गुंतवणूकदारांना शेअर गुंतवणुकीचे मार्गदर्शन आणि शेअर बाजारात गुंतवणूक करून वाढीव परताव्याचे आमिष तीन जणांनी दाखविले. या माध्यमातून एक कोटी २३ लाखाची गुंतवणूक स्वीकारून गुंतवणूकदारांना विहित वेळेत त्यांचा परतावा दिला नाही. आपली फसवणूक झाल्यावर गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून ग्रोथअप इंडिया आणि अर्थयुक्ती कन्सलटिंगचे संदीप जोशी (३६) आणि संकेत जोशी (४५) यांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना ११ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. याप्रकरणातील तिसरा गुंतवणूक सल्लागार अनिकेत मुजुमदार यांचा पोलीस शोध घेत आहेत.

डोंबिवली पूर्वेतील स. वा. जोशी शाळेच्या बाजुला असलेल्या एका सोसायटीत या दोन्ही गुंतवणूकदार संस्थांची कार्यालये होती. या कार्यालयांभोवती शेअर बाजाराचे प्रशिक्षण देणारी फलकबाजी करण्यात आली होती, असे पोलिसांनी सांगितले.

पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना सांगितले, डोंबिवलीतील संदीप, संकेत जोशी आणि अनिकेत मुजुमदार यांनी शेअर बाजारात गुंतवणूकविषयक मार्गदर्शन वर्ग सुरू केले होते. आणि शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून मार्गदर्शन वर्गात येणाऱ्या विद्यार्थी, नागरिकांकडून दहा टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक स्वीकारली होती.

गुंतवणूकदारांना ठरलेल्या वेळेत ग्रोथअप आणि अर्थयुक्त एजन्सीच्या सल्लागारांनी गुंतवणुकीवरचा दहा टक्के परतावा देणे अपेक्षित होते. वारंवार तगादा लावूनही तिन्ही गुंतवणूकदार विद्यार्थ्यांना वाढीव परतावा देण्यावरून उडवाउडवीची उत्तरे, टाळाटाळ करत होते. तिघेजण आपली फसवणूक करत आहेत याची जाणीव झाल्यावर गुंतवणूक केलेल्या दहा जणांनी रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांना गुंतवणूुकदारांनी सर्व प्रकारची सबळ माहिती उपलब्ध करून दिली. रामनगर पोलिसांनी तात्काळ गुंतवणूकदार मोहन सावंत यांच्या तक्रारीवरून संदीप जोशी, संकेत जोशी आणि अविनाश मुजुमदार यांच्या विरुध्द तक्रार केली. पोलिसांनी संदीप आणि संकेत जोशी यांना तात्काळ अटक केली. मुजुमदारचा शोध पोलीस घेत आहेत. ही तक्रार दाखल होताच इतर गुंतवणूकदारांनी या तिघांविरुध्द रामनगर पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या, असे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा गुंतवणुकीचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता उपायुक्तांनी वर्तवली. वाढीव परतव्याचे आमिष दाखवून कोणी गुंतवणूक करण्यास सांगत असेल तर त्या आमिषाला बळी पडू नका. कोणी फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याला कळवा, असे आवाहन पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी नागरिकांना केले आहे.