डोंबिवली: डोंबिवली पूर्व भागात सावरकर रस्त्यावर मुख्य वर्दळीच्या भागात एका जुनाट झाडाला लाकडाची कैची मारण्यात आली आहे. या झाडाच्या आधाराने कैचीच्या माध्यमातून लोखंडी सळया वाकविण्यासाठीची सुविधा या भागातील काही व्यावसायिकांनी केली आहे. सळ्या वाकविण्यासाठी अन्य अनेक सुविधा असताना झाडे का वेठीस धरली जातात, असे प्रश्न पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित करत आहेत.

सळया वाकविण्यासाठीची कैची झाडाच्या आधाराने करण्यासाठी झाडामध्ये मोठे खिळे ठोकण्यात आले आहेत. या खिळ्यांच्या माराने झाड मरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोखंडी सळया झाडाच्या आधाराने कैचीच्या माध्यमातून वाकविताना झाडाच्या बुंध्याचा कामगार घेत आहेत. त्यामुळे झाडाच्या साली ही कामे करताना निघत आहेत.

मागील काही दिवसांपासून हा प्रकार सावरकर रस्त्यावर सुरू आहे. सीमेंट काँक्रीट रस्ते करताना झाडा खालील मातीचे भराव निघून गेले आहेत. त्यामुळे जुनी झाडे आता धोकादायक स्थितीत झाली आहेत. अलीकडेच फडके रस्त्यावर गुलमोहराचे एक जुनाट झाड कोसळले. कल्याण पूर्व भागात चिंचपाडा भागात गुलमोहराचे झाड एका रिक्षेंवर कोसळून तीन जण जागीच ठार झाले.

कल्याण डोंबिवली पालिका प्रशासन, काही पर्यावरणप्रेमी चारुदत्त कोलारकर, रुपाली शाईवाले, राहुल जगन्नाथ कल्याण, डोंंबिवली शहर परिसरातील झाडांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पर्यावरणप्रेमी कोलारकर यांनी डोंबिवलीतील सीमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील झाडांना स्वखर्च मेहनतीने आळी तयार करून त्यांना मातीचा आधार देण्याचे काम सुरू केले आहे.अशाप्रकारे पर्यावरणप्रेमी नागरिक झाडांच्या संगोपनासाठी प्रयत्न करत आहेत. त्याचवेळी काही व्यावसायिक मात्र झाडांचा वापर लोखंडी सळ्या वाकविणे आणि आपली व्यावसायिक कामे करण्यासाठी करत असल्याने सावरकर रस्ता भागातील नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी अचानक भेट देऊन झाडाला कैची मारणाऱ्या व्यावसायिकावर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. पालिकेने यापूर्वी झाडांवर वीजेच्या माळा टाकून झाडे विद्युत प्रदूषित करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्ये हाॅटेल चालक, खासगी आस्थापना, ढाबे चालक यांचा समावेश आहे.