डोंबिवली – कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकात घाईत असलेल्या किंंवा लोकलमध्ये चढताना महिला प्रवाशांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या, महिलांच्या हातामधील पैशाची पर्स, मोबाईल हिसकावून पलायन करणाऱ्या एका सराईत चोरट्या महिलेला पकडण्यात डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना यश आले आहे. या महिलेकडून पोलिसांनी चोरीचा सोन्याचा ऐवज, मोबाईल जप्त केला आहे.

वैशाली सचदेव (२७) असे या चोरट्या महिलेचे नाव आहे. ती पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहे. अनेक गुन्हे प्रकरणात पोलिसांना ती तपासासाठी हवी होती. मागील काही महिन्यांपासून कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, आसनगाव, ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यान प्रवास करणाऱ्या महिलांच्या डब्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. महिलांच्या हातामधील पैशाची पर्स, मोबाईल हिसकावून नेला असल्याच्या तक्रारी महिला प्रवाशांकडून कल्याण, डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल होत होत्या. अचानक महिलांच्या डब्यात चोऱ्या वाढल्याने लोहमार्ग पोलीस चक्रावून गेले होते.

महिला डब्यात चोरी करण्याची महिला चोरट्याची पध्दत एकच होती. त्यामुळे ठराविक महिला चोरटीच या चोऱ्या करत असल्याचा पोलिसांना संशय होता. डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली रेल्वे पोलिसांनी महिला डब्यांवर पाळत ठेऊन या डब्यात चोऱ्या करणाऱ्या महिलेच्या अटकेसाठी सापळे लावले होते.

बुधवारी संध्याकाळी सीएसएमटी आसनगाव लोकल डोंबिवली स्थानकातून आसनगाव दिशेकडे निघाली होती. त्यावेळी काही महिलांना आपल्या पर्समधील पैसे, मोबाईल चोरीला गेल्याचे दिसले. काहींना आपल्या पर्स उघड्या असल्याचे दिसले. सर्व महिला प्रवाशांनी ओरडा केला. लोकल डब्यातील कोणीतरी चोरट्या महिलेनेच हे प्रकार केले असावेत असा महिलांना संशय आला. या चोरीची चर्चा सुरू असताना डब्यात एक महिला प्रवासी म्हणून संशयास्पद स्थितीत उभी होती. महिला प्रवाशांनी त्या महिलेला जाब विचारताच ती गडबडून गेली. ती डोंबिवली रेल्वे स्थानकात उतरून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. डब्यातील महिलांनी ओरडा केला आणि त्या महिलेला पकडून ठेवले. फलाटावरील रेल्वे पोलिसांनी महिलांचा ओरडा ऐकून तेथे धाव घेतली. त्या महिलेला ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात आणल्यावर महिला पोलिसांनी तिची झडती घेतली. तिच्याजवळ महागडा मोबाईल, चोरीचा ऐवज सापडला. ही महिला सराईत चोर असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. घाटकोपर रमाबाई आंबेडकर भागात राहणाऱ्या प्रियंका प्रकाश गांगुर्डे या रविवारी संध्याकाळी कल्याण रेल्वे स्थानकातून रेल्वे घाटकोपर रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करत असताना त्यांच्या गळ्यातील आठ तोळ्याचे चार लाख किमतीची सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार केली आहे. वैशाली सचदेव भोळाभाबडा चेहरा करून महिला डब्यात प्रवासी म्हणून चढत होती. चोरीचा कार्यभाग साधत होती.