Fake Call center : ठाणे: काही दिवसांपूर्वी सीबीआयच्या पथकाने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये चालवल्या जाणाऱ्या बनावट कॉल सेंटरचा अड्डा छापा घालून उध्वस्त केला होता. यामध्ये त्यावेळी मुंबईतील पाच जणांना अटकही करण्यात आली होती. अटक केलेल्यांमध्ये मीरा-भाईंदर मधील दोघांचा समावेश असून या दोघांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यात अशाच प्रकारे बनावट कॉल सेंटर चालवले असल्याची धक्कादायक कबुली दिल्याचे सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांकडून कळते. त्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विशेष म्हणजे पालघर आणि रायगड जिल्ह्यात वरिष्ठ पदांवर काम करणारे दोघे पोलीस अधिकारी प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यात सापडण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
सीबीआयने इगतपुरी मधील रेन फॉरेस्ट या पंचतारांकित हॉटेलमध्ये काही दिवसांपूर्वी धाड टाकून काही खासगी व्यक्तींकडून चालवले जाणारे बनावट कॉल सेंटर उध्वस्त केले होते. मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून ग्राहकांच्या बँक खात्यातील पैसे उकळल्याचे उघडकीस आल्यानंतर सीबीआयने ही छापेमारी केली होती. या छाप्यामध्ये एक कोटी २० लाख रुपयांची रोकड, सात आलिशान वाहने,अर्धा किलो सोने, ४४ लॅपटॉप आणि ७१ मोबाईल जप्त करण्यात आले होते.
या प्रकरणी मुंबई आणि पालघर मधील पाच जणांना अटक करण्यात आली होती. या बनावट कॉल सेंटर मार्फत केवळ राज्यातील आणि देशातील नव्हे तर अमेरिका, कॅनडा तसेच अन्य देशातील नागरिकांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे . हे रॅकेट चालवण्यासाठी ६० ऑपरेटर्सची भरती या बनावट कॉल सेंटरमध्ये करण्यात आली होती. सीबीआयच्या हाती या छाप्यामध्ये मोठे घबाड लागले असून मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवहार केल्याचे आढळून आले आहे.
वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीत?
या प्रकरणी अटकेत असलेल्या मीरा-भाईंदर मधील दोन आरोपींची सीबीआयने कसून चौकशी केली असता या दोन्ही आरोपींनी यापूर्वी पालघर,रायगड जिल्ह्यात तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना उपकृत करत अशाच प्रकारे बनावट कॉल सेंटर चालवले असल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. विशेष म्हणजे या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची रायगड व पालघर जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यांमध्ये बदली झाल्यानंतर या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी बनावट कॉल सेंटर देखील त्यांच्या बदली झालेल्या कार्यक्षेत्रामध्ये स्थलांतरित करून तेथेही ते स्वतःच्या संरक्षणात उघडपणे सुरू ठेवल्याची माहिती ही संबंधित आरोपींनी सीबीआयकडे दिल्याचे कळते.
या बनावट कॉल सेंटर प्रकरणात शेकडो नागरिकांची फसवणूक करण्यात आली असून या कॉल सेंटरची प्रति दिवसाची कमाई दोन कोटींची असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी सीबीआयकडे संबंधित अधिकाऱ्यांचे कोर्ट मार्शल होणार असल्याचे सांगण्यात आले. अशाच एका प्रकरणात मीरा-भाईंदर मधील गुन्हे शाखेने बनावट कॉल सेंटरवर धाड घालून मोठी कारवाई केल्याचा देखावा उभा केला होता. पालघर जिल्ह्यात अशा प्रकारच्या कॉल सेंटरचा जाळ खूप मोठ्या प्रमाणे विणले गेल्याची चर्चा होती. या भागात काम करणार आहे एक वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात सामील असल्याचेही बोलले जात होते. अधिकारी त्या भागात होता तोवर कॉल सेंटरचा उद्योग तेथेही बिनभोबट सुरू होता.
मीरा भाईंदर मधील छाप्यानंतर स्थानिक पोलिसांनी गुन्हा दाखल करून किरकोळ आरोपींना अटक केली आणि मुख्य आरोपींना मात्र या प्रकरणातून मोकाट सोडले अशीही धक्कादायक माहिती यातील आरोपींनी सीबीआयला दिली आहे. हे सर्व व्यवहार करणाऱ्या अधिकारी यांचीही नावे आरोपींनी सीबीआय कडे दिली असल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे.त्यामुळे हे बडे अधिकारी कोण याविषयी उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
सीबीआय पाठवणार पोलीस महासंचालकांना अहवाल
या प्रकरणात गुंतलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची नावे सीबीआय मार्फत राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याकडे कारवाईसाठी लवकरच पाठवली जाणार आहेत असेही सीबीआयच्या वरिष्ठ सूत्रांकडून कळले.