कल्याण : कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नेवाळी फाटा येथील प्रसिद्ध आमंत्रण ढाबा आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्तांनी मंगळवारी तोडकाम पथकाच्या साहाय्याने जेसीबी यंत्राच्या साहाय्याने भुईसपाट केला. या ढाब्याच्या विरुद्ध नेवाळी परिसरातील नागरिकांनी ३५० हून अधिक तक्रारी मागील आठ वर्षांच्या कालावधीत केल्या होत्या.

आमंत्रण ढाबा कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावरील नेवाळी फाटा भागात मुख्य वर्दळीची जागा अडवून उभा करण्यात आला होता. या ढाब्याच्या परिसरातील जागा ढाबा मालकाने हडप करून तेथे झाडे लावली होती. मोकळ्या जागेत ग्राहकांची बसण्याची व्यवस्था केली होती. या ढाब्यापासून पालिकेला कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नव्हते. या बेकायदा ढाब्या विरुद्ध २०१७ पासून नेवाळी, मलंगगड परिसरातील रहिवासी, प्रवाशांनी अनेक तक्रारी पालिकेच्या आय प्रभागात केल्या होत्या. विविध प्रकारचे दबाव आणून पालिकेच्या कारवाईत ढाबा मालक अडथळे आणत होता. तसेच, यापूर्वीच्या आय प्रभागाच्या कोणत्याही साहाय्यक आयुक्ताने हा ढाबा तोडण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली नाही.

हेही वाचा : कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशाला बेदम मारहाण, लुटमारीत पाच हजार रूपये चोरले

आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांनी आमंत्रण ढाबा विरुध्दच्या ३५० तक्रारींचा निपटारा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ढाबा मालकाला कारवाईची विहित प्रक्रिया पूर्ण करून ढाब्याची जागा स्वताहून रिकामी करण्याची नोटीस दिली. विहित मुदतीत ती जागा रिकामी न करण्यात आल्याने मंगळवारी आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड, उपायुक्त अवधूत तावडे यांच्या आदेशावरून साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी आमंत्रण ढाबा भुईसपाट करण्याची कारवाई केली. यावेळी काही जणांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुंबरकर यांनी पोलीस बंदोबस्तावरील पोलिसांच्या साहाय्याने संबंधितांंना तेथून पिटाळून लावले.

हेही वाचा : जुन्या ठाण्यात बिल्डरच्या कारनाम्यामुळे रहिवाशी हवालदिल, भागीदारासंह रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी चार गुन्हे दाखल

आमंत्रण ढाब्याचे पक्के, ताडपत्री, बांंबूचे बांधकाम तोडून टाकण्यात आले. या कारवाईने परिसरातील नागरिक, तक्रारदारांनी समाधान व्यक्त केले. आय प्रभागात मागील दीड वर्षापासून बेकायदा चाळी, इमारतींविरुध्द सुरू असलेल्या आक्रमक कारवाईने या भागातील भूमाफियांमध्ये अस्वस्थता आहे. आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी वर्षभरात सहाहून अधिक इमारती भुईसपाट केल्या आहेत.

हेही वाचा : वडाळा-घाटकोपर-ठाणे मेट्रो मार्गिकेचे काम ६५ टक्के पूर्ण, ठाण्यात डिसेंबर २०२५ नंतर मेट्रो धावणार

आय प्रभाग हद्दीतील मलंगगड, आडिवली,ढोकळी, नेवाळी फाटा भागात अनेक ढाबे आहेत. या ढाब्यांंपासून पालिकेला महसूल मिळत नाही. त्यामुळे आयुक्त, उपायुक्तांचे मार्गदर्शन घेऊन या भागातील बेकायदा ढाबे अशाच प्रकारे तोडण्याची मोहीम हाती घेण्याचे नियोजन केले जात आहे.

हेमा मुंबरकर (साहाय्यक आयुक्त, आय प्रभाग, कल्याण)