कल्याण – कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील एका डिलिव्हरी बाॅयला याच भागातील तीन तरूणांनी जीवघेणी मारहाण केली. या तरूणाच्या नाकावर बांबूचा फटका बसल्याने त्याच्या नाकाचे हाड तुटले आहे. या तरूणाला श्वासोच्छावास घेताना त्रास होत आहे. मोबाईलमधील चित्रीकरणावरून हा वाद झाला.

इंद्रजित रवींद्रसिंह संधू (१९) असे जीवघेणी मारहाण झालेल्या वस्तू वितरक मुलाचे नाव आहे. तो खडेगोळवलीतील गजानन आयकाॅन इमारतीत कुटुंबीयांसह राहतो. सोमवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला आहे. कार्तिक कांबळे, प्रशांत नाईक आणि सुमित आत्राम अशी मारहाण करणाऱ्या टोळक्याचे नाव आहे. ते याच भागातील रहिवासी असल्याचा तक्रारदाराला संशय आहे.

खडेगोळवली भागातील मानवता रुग्णालयाजवळील डाॅमिनोज पिझ्झाजवळ ही घटना घडली. तक्रारदार इंद्रजित संधू वस्तु वितरक म्हणून काम करतात. ग्राहकांच्या वस्तू विक्री करून परत आल्यावर इंद्रजित संधू आपल्या सहकाऱ्यांसह सोमवारी रात्री सव्वा दोन वाजण्याच्या दरम्यान डाॅमिनोज पिझ्झामध्ये जात होते. त्यावेळी या दुकानाच्या बाजुला तीन तरूण उभे होते. ते त्यांच्या कामासाठी उभे असावेत म्हणून त्यांच्याकडे न पाहता संधू आणि सहकारी दुकानात जाऊ लागले. त्यावेळी गुन्हा दाखल तरूण प्रशांत नाईक, कार्तिक कांबळे आणि सुमित आत्राम हे संधू आणि त्यांच्या मित्रांचे मोबाईलमधून चित्रीकरण करू लागले.

इंद्रजितने पाठीमागे येऊन तुम्ही आमचे चित्रीकरण का करता, असा प्रश्न केला. तेव्हा प्रशांतने तू मला असे विचारणारा कोण, असा प्रश्न करून इंद्रजित बरोबर हुज्जत घातली. आपणास प्रतिप्रश्न केला म्हणून प्रशांत नाईकने इंद्रजितला शिवीगाळ करत बेदम मारहाण सुरू केली.

इंद्रजितच्या बचावासाठी त्याचे मित्र साहिल आणि हर्षल पुढे आले. हर्षलच्या हातात श्वान हाकलण्याची बांबूची लहान काठी होती. ती प्रशांतने हिसकावून घेतली. या काठीच्या साहाय्याने प्रशांतने इंद्रजितला मारहाम सुरू केली. ही मारहाण सुरू असताना प्रशांतने बांबूच्या काठीचा एक फटका जोराने इंद्रजित संधू या डिलिव्हरी बाॅयच्या नाकावर मारला. त्या बरोबर नाकाचे हाड तुटून नाक आणि तोंडातून रक्तस्त्राव सुरू झाला. या मारहाणीनंतर हे टोळके पळून गेले.

उल्हासनगरमधील मध्यवर्ति रुग्णालयात तपासणी केल्यावर इंद्रजित याच्या नाकाचे हाड तुटल्याचे स्पष्ट झाले. इंद्रजितचा एक दात या मारहाणीत तुटला आहे. दोन दातांना इजा झाली आहे. इंद्रजितला श्वास घेण्यास त्रास होत आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक वाय. एम. धोंगडे तपास करत आहेत.