कल्याण – कल्याणमधील एका दुकानात ग्राहक वस्तू खरेदी करत असताना रांगेतील एक परप्रांतीय ज्येष्ठ महिला दुकानातील आगरी समाजातील मुलाला हिंदी बोलण्याचा आग्रह करत होती. ‘मला हिंदी येत नाही. मी मराठीतच बोलणार’ हा आगरी समाजातील मुलगा बोलत असताना, अचानक या परप्रांतीय महिलेने रागाच्या भरात त्या ग्राहक सेवेतील आगरी समाजातील मुलाला मराठीतून बोलत ‘ तू हिंदीतून का बोलत नाहीस. तू हिंदीतून बोल. तु काय बोलतो ते मला समजत नाही. मराठी माणसे कचरा आहेत. आम्ही (परप्रांतीय) आहोत म्हणून तुम्ही आहात. आमच्या जीवावर तुम्ही जगता’ अशी टिपणी करत त्या दुकानातील ग्राहक सेवेतील मुलाला हिणवण्याचा प्रयत्न केला.
हा सगळा प्रकार पाहून या परंप्रातीय महिलेच्या पाठीमागे उभे असलेले इतर ग्राहक संतप्त झाले. ग्राहक सेवेतील आगरी मुलाची काही चुकी नसताना, तो प्रामाणिकपणे सेवा देत असताना ही परप्रांतीय महिला त्या मुलाच्या अंगावर वस्तू का फेकते. त्याच्या विषयी हिणवण्याची भाषा का करते. स्वत: मराठीतून बोलते मग, त्या मुलाला हिंदी बोलण्याची का सक्ती करते, असे प्रश्न इतर ग्राहकांना पडले.
या रांगेत आपल्या पतीसह सामान खरेदीसाठी आलेल्या ठाकरे गटाच्या कल्याणमधील कार्यकर्त्या कांचन खरे यांनी पुढे होत, त्या परप्रांतीय महिलेला उद्देशून आपण स्वत: मराठीतून बोलता. मग त्या ग्राहक सेवेतील आगरी समाजातील मुलाला तुम्ही का हिंदी बोलण्याची सक्ती करता. त्याला हिंदी येत नाही हे तो मुलगा सांगतो. तरी तुम्ही त्रागा करत त्या मुलाला का जबरदस्तीने हिंदी बोलण्याची सक्ती करता आणि मराठी ही आमची अभिजात, मातृभाषा आहे. तुम्ही महाराष्ट्र, मराठी भाषेला कचरा कसे म्हणता. तुम्हाला हा अधिकारी कोणी दिला, असे प्रश्न केले.
कांचन खरे यांच्या प्रश्नांच्या सरबत्तीने ती परप्रांतीय महिला बिथरली. तेवढ्यात दुकानात मनसेचे पदाधिकारी दाखल झाले. पोलिसांना बोलविण्यात आले. दुकानदाराने त्या परप्रांतीय ज्येष्ठ महिलेला समजविण्याचा प्रयत्न केला. ती महिला सुरूवातीला आक्रमक होती. मग पोलीस, मनसे, ठाकरे गटाचे कार्यकर्ते दुकानात आल्यावर परप्रांतीय महिला घाबरली. आपली चूक झाली. आपण असे बोलायला नको होते, अशी भाषा करून तिने उपस्थितांची माफी मागितली. या महिलेला धडा बसलाच पाहिजे म्हणून पोलिसांनी या परप्रांतीय महिलेला पोलीस ठाण्यात नेले. तिथे तिला समज देऊन सोडून देण्यात आले.
मराठी ही आमची मातृ आणि अभिमानाची भाषा आहे. मराठी भाषा, व्यक्ति बद्दल कोणी अर्वाच्च बोलत असेल तर महाराष्ट्रातील कोणीही माणूस ते सहन करणार नाही. दुकानातील ती परप्रांतीय महिला दुकानातील ग्राहक सेवेतील कर्मचाऱ्या बरोबर असभ्य वर्तन करत होती. त्यामुळे तिला मराठी भाषा आणि मराठी माणूस काय आहे याची ओळख करून दिली. – कांचन खरे, ठाकरे गट कार्यकर्त्या, कल्याण.