कल्याण – कल्याणमधील आधारवाडी तुरुंगातील एका न्यायबंदीने आधारवाडी तुरुंगात रागाच्या भरात एका पोलीस हवालदाराला सोमवारी बेदम मारहाण केली. या न्यायबंदीला कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात गुन्ह्यातील सुनावणीच्या कामासाठी पोलीस बंदोबस्तात नेण्यात आले होते. सुनावणीच्यावेळीही या न्यायबंदीने न्यायालयात न्यायदंडाधिकारी यांच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला होता, असे खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
सुरज शंकर सिंग उर्फ विरेंद्र शंकर मिश्रा (२९) असे न्यायबंदीचे नाव आहे. सुरज सिंग हा भिवंडी जवळील सोनाळे गावातील प्रकाश मढवी चाळीत राहणारा इसम आहे. एका गुन्ह्याच्या प्रकरणात तो आधारवाडी कारागृहात न्यायबंदी आहे. सुनील लोटन पाटील (५७) असे मारहाण झालेल्या हवालदाराचे नाव आहे.
सुनील लोटन पाटील यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गुन्हा दाखल न्यायबंदी सुरज सिंग हा भिवंडी तालुक्यातील सोनाळे गावाचा रहिवासी आहे. सोमवारी दुपारी बारा वाजता सुरज सिंग याच्यासह इतर चार न्यायबंदी यांना कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयात त्यांच्या गुन्ह्यातील सुनावणीसाठी पोलीस बंदोबस्तात पोलीस वाहनातून आणण्यात आले होते. न्यायालय सुरू झाल्यानंतर सुरज सिंग आणि इतर न्यायबंदी यांना न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे न्यायादंडाधिकारी यांच्या समोर हजर करण्यात आले.
सुनावणी सुरू असताना न्यायबंदी सुरज सिंग हा त्याच्या खटल्यासंदर्भात न्यायदंडाधिकारी यांच्याशी वाद घालू लागला. न्यायालयाने त्याला शांत राहण्याची सूचना केली. बंदोबस्तावरील पोलीस त्याला शांत राहण्यास सांगत होते. पण सुरज सिंग ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी न्यायालयाने आरोपी सुरज सिंग याला न्यायदान कक्षाच्या बाहेर नेण्याची सूचना केली. पोलिसांनी सुरज सिंगला न्यायदंडाधिकारी यांच्या समोरून हटवून त्याला न्यायदान कक्षाच्या बाहेर आणले. या गोष्टीचा सुरज सिंगला राग आला.
न्यायालयातील या प्रकारानंतर सुरज सिंग आणि इतर न्यायबंदी यांना आधारवाडी तुरुंगात पुन्हा पोलीस बंदोबस्तात आणण्यात आले. न्यायबंदी सुरज सिंगला तुरुंगात आणल्यानंतर त्याला त्याच्या कोठडीत हवालदार सुनील पाटील जमा करण्यास चालले होते. त्यावेळी अचानक सुरज सिंगने हवालदार पाटील यांच्या कानशिलात मारली. काही क्षणात सुरज सिंगने आक्रमक रूप धारण करून रागाच्या भरात हवालदार सुनील पाटील यांना छातीवर, पोटावर ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. हा प्रकार सुरू असताना इतर पोलीस कर्मचारी धाऊन आले. त्यांनी सुरज सिंगच्या तावडीतून हवालदाल पाटील यांची सुटका केली.
सुरज सिंगच्या कृत्याबद्दल त्याच्या विरुध्द मारहाण आणि सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार खडकपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डाॅ. अमरनाथ वाघमोडे, पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. दांगट तपास करत आहेत.