कल्याण – कल्याण पूर्वेतील चिकणी पाडा येथील श्री सप्तश्रृंगी इमारतीमधील रहिवाशांनी गुरूवारी कल्याण डोंबिवली पालिका मुख्यालयात येऊन अधिकाऱ्यांकडे योग्य ठिकाणी आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. आमचा संसार घरात सोडून आम्ही एका शाळेत राहत आहोत. आता शाळा सुरू होतील. त्यानंतर आम्ही काय करायचे, असे प्रश्न शोकाकुल रहिवाशांनी केले.

श्री सप्तश्रृंगी इमारती मधील स्लॅब कोसळल्यानंतर आपत्कालीन विभागाने आम्हाला पाच मिनिटांचा अवधी देऊन घरातील फक्त आवश्यक महत्वाची कागदपत्रे, मौल्यवान दागिने घेऊन घराबाहेर पडण्यास सांगितले. वीस वर्ष एका जागेत राहून तेथे आम्ही आमचे संसार उभे केले आहेत. हे संसार आम्ही पाच मिनिटात सोडून घराबाहेर पडलो आहोत. अशा परिस्थितीत पालिका अधिकाऱ्यांनी आमच्या परिस्थितीचा विचार करून आम्हाला योग्य जागी पुनर्वसित करावे, अशी मागणी रहिवाशांनी केली. कल्याण पूर्वेत आम्ही ज्या नूतन विद्यामंदिर शाळेत राहतो. तेथे शाळा सुरू होण्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची, रंगरंगोटीची कामे होण्याची शक्यता आहे. त्यानंतर शाळा आणि पाऊस सुरू होईल. त्यानंतर आम्ही कोठे जायचे. तात्काळ कोणी घर घेऊ शकेल, अशीही कोणाची परिस्थिती नाही. त्यामुळे शासनाने आमचे म्हणणे ऐकून आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी रहिवाशांच्यावतीने रेखा पाठारे या महिलेने केली.

श्री सप्तश्रृंगी इमारतीमधील मृत व्यक्तिच्या कुटुंबीयांना शासनाने आर्थिक साहाय्य जाहीर केले आहे. ती रक्कम लवकर त्यांना देण्यात यावी. काही जखमी रहिवासी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर योग्य ते उपचार व्हावेत. शासनाने आमच्या मागण्यांचा प्राधान्याने विचार करावा. अतिशय सनदशीर मार्गाने आमच्या मागण्या आम्ही प्रशासनाकडे मांडण्यासाठी आलो आहोत. प्रशासन त्याचा सहानुभूतिपूर्वक विचार करील, अशी अपेक्षा रहिवाशांनी व्यक्त केल्या.

इमारत कोसळून गुरूवारी तीन दिवस झाले आहेत. या इमारतीमधील सहा कुटुंबीयांच्या घरात अंत्येष्टीचे विधी आहेत. तरीही हे रहिवासी शोकाकुल अवस्थेत पालिकेत आले आहेत. या परिस्थितीचा पालिका, शासनाने विचार करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली. पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त उपस्थित नसल्याने या रहिवाशांना शुक्रवारी भेटण्याची वेळ देण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसापूर्वी कल्याण पूर्वेत चिकणी पाडा येथे श्री सप्तश्रृंगी इमारतीच्या चौथ्या माळ्यावर कृष्णा चौरासिया यांच्या घरात सदनिका सौंदर्यीकरणाचे काम सुरू होते. यावेळी सदनिकेच्या पृष्ठाचा भाग कोसळला. त्यानंतर या इमारतीमधील चारही घरांचे नुकसान झाले. यामध्ये सहा रहिवाशांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. कृष्णा चौरासिया या रहिवाशावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.