लोकसत्ता खास प्रतिनिधी

कल्याण: येथील बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील इंदिरानगर भागातील एका हाॅटेलमध्ये घुसून स्थानिक तीन रहिवाशांनी रोखपालाकडे पैशाची मागणी केली. ती मागणी पूर्ण न केल्याने तीन जणांनी रोखपालाला बेदम मारहाण करुन हाॅटेलमधील सामानाची तोडफोड केली. सोमवारी संध्याकाळी हा प्रकार घडला.

बिर्ला महाविद्यालय रस्त्यावरील इंदिरानगर मधील डिव्हाईन हाॅटेलमध्ये हा प्रकार घडला आहे. या मारहाणीत हाॅटेलचे रोखपाल सुरुजकुमार चौपाल (२४) गंभीर जखमी झाले आहेत. मिलिंदनगरमध्ये राहणाऱ्या दत्ता सुनील जाधव, सिध्देश उर्फ भोप्या सुनील जाधव आणि अन्य एक अशा तीन जणांनी हा मारहाणीचा प्रकार केल्याने महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी त्यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा… रेल्वे मार्गात उभे राहून लोकलमध्ये चढण्याचा प्रयत्न; दिवा रेल्वे स्थानकातील प्रकार

पोलिसांनी सांगितले, कल्याण पश्चिमेत इंदिरानगर भागात रामण्णा शेट्टी आणि राजेश शेट्टी यांनी डिव्हाईन हाॅटेल चालविण्यास घेतले आहे. या हाॅटेलचा रोखपाल म्हणून सुरजकुमार काम पाहतो. सोमवारी संध्याकाळी आरोपी आरोपी सुनील आणि सिध्देश मोठ्याने ओरडत हाॅटेलमध्ये शिरले. त्यांनी हाॅटेलचे चालक रामण्णा यांच्या नावाने ओरडा करुन आम्हाला तात्काळ पैसे पाहिजेत, अशी मागणी सुरू केली होती. रोखपाल सुरजकुमार तिन्ही आरोपींना समजविण्याचा प्रयत्न करत होता.

हेही वाचा… ठाणे लोकसभेच्या जागेचा निर्णय शिंदे-फडणवीस घेणार; पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

चालक रामण्णा आराम करत आहेत. ते आले की आपली भेट घालून देतो, असे सांगत असताना आरोपींनी सोडावाॅटरची बाटली सुरजकुमार यांच्या हातावर मारली. हाॅटेलमधील सामान, नक्षीकाम, मंचकाची तोडफोड केली. मंचकावर लावलेल्या किमती मद्याच्या बाटल्या आरोपींनी फोडल्या. घडला प्रकार चालक रामण्णा यांना सांगण्यासाठी सुरजकुमार हाॅटेलच्या चौथ्या माळ्यावर जिन्यावरुन चालले होते. त्यांना आरोपींनी पाठीमागे ओढून शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या प्रकाराने हाॅटेलमध्ये बसलेल्या ग्राहकांची पळापळ झाली.

हेही वाचा… कल्याणमध्ये अखंड वाचनयज्ञ; दहा हजारहून अधिक वाचक आणि रसिकांचा सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ग्राहक सेवेतून मिळालेले १२ हजार रुपये सुरजकुमार यांनी स्वतःच्या खिशात सुरक्षितेसाठी ठेवले होते. मारहाणीच्यावेळी आरोपींनी ती रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. या प्रकारानंतर आरोपी पळून गेले. सुरजकुमार यांनी याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.