कल्याण: डोंबिवली पूर्वेतील आयरे गावातील एका जमिनीवर एक बेकायदा बंगला स्थानिकांकडून उभारण्यात आला आहे. या बंगल्यावर कारवाई करावी म्हणून मागील दोन वर्षापासून पालिकेकडे पाठपुरावा करूनही या बेकायदा बंंगल्यावर कारवाई केली जात नव्हती. त्यामुळे याप्रकरणातील तक्रारदार अलका शरद म्हात्रे (सासू) आणि रिमा म्हात्रे (सून) यांनी कल्याणमध्ये पालिकेच्या मुख्यालयासमोर जोपर्यंत आयरेतील बेकायदा बांधकामे तोडले जात नाही, तोपर्यंत मागील चार दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते.

सोमवारपासून सुरू असलेल्या या उपोषणात शरद म्हात्रे, अलका म्हात्रे, रिमा म्हात्रे सहभागी झाले होते. उन, वारा, पावसाची पर्वा न करता दिवस, रात्र सासू सुना कल्याणमध्ये पालिकेच्या मुख्यालयासमोर पदपथावर बेमुदत उपोषणास बसल्याने नागरिक आश्चर्यचकित झाले होते. बेकायदा बांधकामांवरून दोन महिलांना बेमुदत उपोषणास बसावे लागते, या विषयी नागरिक अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणाली विषयी तीव्र नाराजी व्यक्त करत होते. अभिनव गोयल यांच्यासह समपदस्थ अधिकारी या उपोषणकर्त्या महिलांसमोरून मागील चार दिवस येजा करत होते. या महिलांनी उपोषणाला बसू नये म्हणून पालिका अधिकाऱ्यांनी आटोकाट प्रयत्न केले.

नगररचना विभागाने या महिलांना आम्ही त्या बंगल्याचा नियमानुकूल करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे असे सांगून महिलांना उपोषण मागे घेण्याचे सूचित केले. ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनीही या बेकायदा बांधकामांवर पोलीस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते. पावसाळा तोंडावर आला आहे. त्यामुळे या बंगल्यावर तातडीने कारवाई करावी, यासाठी या दोन्ही महिला आग्रही होत्या. मागील दोन दिवसांच्या वादळ वारा, पावसातही त्या पालिके बाहेरील पदपथावरच बसून होत्या.

गुरुवारी रात्री मुख्य सुरक्षा अधिकारी सुरेश पवार, सुरक्षा अधिकारी रमेश पौळकर, ग प्रभागाचे साहाय्यक आयुक्त संजयकुमार कुमावत यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून उपोषणकर्त्या महिलांशी मुत्सेद्दीगिरीने संवाद साधला. त्यांना आयरेतील बेकायदा बांधकामावर येत्या आठवड्यात कारवाई करण्याचे ठोस आश्वासन दिले. या आश्वासनाची खात्री पटल्यावर अलका म्हात्रे, रिमा म्हात्रे यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. सुरक्षा अधिकारी रमेश पौळकर यांनी या संवादाच्या दरम्यान महत्वाची भूमिका बजावली.

प्रतिक्रिया

उपोषणकर्त्या महिलांच्या तक्रारीप्रमाणे आयरे गावातील संबंधित बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचे आश्वासन उपोषणकर्त्या महिलांना दिले आहे. या आश्वासनाप्रमाणे त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. पोलीस बंदोबस्त घेऊन ठरल्या दिवशी संबंधित बांधकामावर कारवाई केली जाईल. – संजयकुमार कुमावत, साहाय्यक आयुक्त, ग प्रभाग, डोंबिवली.

आयरेतील आमच्या तक्रारीप्रमाणे संबंधित बंगल्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पालिकेने दिले आहे. त्यामुळे आम्ही आमचे बेमुदत उपोषण मागे घेत आहोत. या कारवाईत टाळाटाळ झाली तर आम्ही पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करू. याप्रकरणी न्यायालयात दाद मागू. – रिमा म्हात्रे, उपोषणकर्त्या.