कल्याण – कल्याण पश्चिमेतील दुर्गाडी चौक भागात शनिवारी गौरव रथयात्रेच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेली स्वागत कमान जोरदार वाऱ्यामुळे दुपारी एका बाजुने कोसळली. कमानीची एक बाजू जमिनीलगत आल्याने या भागातून मोठ्या वाहनांना जाताना अडसर येत आहे. ही कमान हटविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने प्रवासी त्रस्त आहेत.
दुर्गाडी चौकात कमान कोसळली, त्यावेळी सुदैवाने त्या भागातून वाहने जात नव्हती. अन्यथा वाहनांचे नुकसान झाले असते. पादचारी या रस्त्याने प्रवास करत असते तर त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला असता. गौरव रथयात्रेची स्वागत कमान कोसळत असताना सुदैवाने तेथून कोणी जात नव्हते. त्यामुळे जीवित आणि वित्त हानी टळली.
दुर्गाडी किल्ल्याच्या पायथ्याशी गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने जाणाऱ्या भागात ही कमान कोसळल्याने भिवंडी बाह्यवळण रस्ता, मुरबाड, नाशिककडून येऊन पत्रीपूल शिळफाटा मार्गे जाणाऱ्या जड, अवजड वाहनांना अडथळा येत आहे. कोसळलेल्या स्वागत कमानीजवळ आल्यानंतर उंच अवजड वाहनांना आपल्याला पुढे जाता येणार नाही असे समजल्यावर वाहन चालकांना वाहन मागे घेऊन मग शिवाजी चौकमार्गे पत्रीपूलमार्गे इच्छित स्थळी जावे लागत आहे. ही वाहने वळविताना या भागात वाहतूक कोंडी होत आहे.
कमान कोसळल्यानंतर कमान लावणारा जाहिरातदार किंवा आयोजकांनी ही कमान तातडीने बाजुला करणे गरजेचे होते. परंतु, कोणीही त्याकडे लक्ष देत नसल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या. कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला शनिवारी कार्यालयीन सुट्टी असल्याने पालिकेचेही या महत्वपूर्ण विषयाकडे दुर्लक्ष झाले. या रस्त्याने जाणाऱ्या प्रवाशांना मात्र या कोसळलेल्या कमानीचा त्रास सहन करावा लागत आहे.