कल्याण: कल्याण पश्चिमेतील एका जवाहिऱ्याच्या दुकानात दोन महिला गेल्या आठवड्यात सोन्याचे दागिने खरेदीसाठी आल्या होत्या. विविध प्रकारच्या दागिन्यांची पारख करत असताना या दोन्ही महिलांनी सराफाची नजर चुकवून हातचलाखी करत सराफाच्या दुकानातील ५४ हजाराचा सोन्याचा ऐवज लबाडी करून चोरला आणि दुकानातून पळून गेल्या.
या महिला सोन्याचे दागिने पाहून गेल्यानंतर सराफाने मंचकावर ठेवलेले सोन्याचे दागिने पुन्हा पूर्वजागेत ठेवण्यास सुरूवात केली तेव्हा त्यांना महिलांना दाखविलेले सोन्याचे नग गायब असल्याचे दिसले. त्यांनी दुकानाच्या मंचकाखाली तपासले. तेथे ते दागिने आढळून आले नाहीत. दुकानात आलेल्या दोन भुरट्या महिलांनीच ते चोरून नेल्याचा संशय घेत दुकानदाराने याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
महेंद्र नरेंद्र जैन यांच्या कल्याण पश्चिमेतील मोहम्मद अली चौकातील संघवी ज्वेलर्स दुकानात हा चोरीचा प्रकार घडला आहे.सराफ महेंद्र जैन यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की गेल्या आठवड्यात दोन महिला सोन्याच्या रिंग खरेदी करण्यासाठी दुपारच्या वेळेत आपल्या दुकानात आल्या होत्या. त्या विविध प्रकारचे दागिने पाहण्यासाठी मागत होत्या. त्याप्रमाणे त्यांना दागिने दाखविले जात होते. त्या दागिन्यांची पारख करत होत्या. त्यांंना सोन्याचे दागिने दाखविले जात असताना त्यांच्यासमोर दागिन्यांचे ट्रे ठेवण्यात आले होते.
दुकानदार दुकानात दागिने दाखविण्यासाठी आत, बाहेर करत असताना या भुरट्या दोन्ही महिलांनी दुकानदाराची नजर चुकवून हातचलाखी करत ट्रेमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आपल्या कपड्यात लपवून ठेवले आणि दुकानातून निघून गेल्या. दागिने पुन्हा आपल्या मूळ जागेवर ठेवत असताना दुकानदार महेंद्र जैन यांना सोन्याचे काही नग कमी असल्याचे दिसले.
काही वेळेपूर्वी दुकानात असलेले सोन्याचे नग अचानक गायब झाले. त्यांनी दुकानात तपासणी केली. दागिने सापडले नाहीत. दुकानात सोने खरेदीसाठी आलेल्या महिलांनीच ते चोरून नेल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.गेल्या वर्षी कल्याण, डोंबिवलीत सराफांना फसविण्याचे प्रकार वाढले होते. याप्रकरणी दोन महिलांना यापूर्वी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर हे प्रकार थांबले होते. हे प्रकार पुन्हा सुरू झाल्याने सराफांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पोलिसांनी अशा भुरट्या महिलांना तातडीने अटक करावी अशी मागणी सराफांच्या संघटनेने केली आहे.