कल्याण : जबलपूर येथून एका व्यापाऱ्याने दोन लाख रूपये आपल्या मुंबईतील भावाला देण्यासाठी एका महिलेच्या ताब्यात दिले होते. या महिलेने जबलपूरहून एक्सप्रेसमधून प्रवास सुरू केला होता. या महिलेने खडवली ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान त्या पैशांचा अपहार केला आणि ते पैसे संबंधित व्यक्तिला न देता स्वत:च्या फायद्यासाठी वापरले असल्याची तक्रार कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. पंजू गोस्वामी (३९) असे व्यापाऱ्याचे नाव आहे. त्यांचा खेळण्याच्या वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे. ते जबलपूर येथे व्यवसाय करतात. संगीता हिरालाल ठाकूर (३३) असे आरोपी महिलेचे नाव आहे. या महिलेने पैशाचा अपहार केला आहे. ही महिला जबलपूर येथील पटेल मोहल्ला भागात राहते.

पोलिसांनी सांगितले, पंजू गोस्वामी हे जबलपूरमधील खेळणी वस्तु विक्रीचे व्यापारी आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायातील दोन लाख रूपये आपल्या मुंबईत राहत असलेल्या गौतमगिरी दिलीपगिरी गोस्वामी यांना देण्यासाठी आरोपी संगीता ठाकूर यांच्याकडे विश्वासाने दिले होते. संगीताने ते पैसे स्वतःच्या ताब्यात घेऊन जबलपूर येथून शुक्रवारी एक्सप्रेसने मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला होता.

हेही वाचा : ठाणेकरांना तुर्तास जलदिलासा, सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय नाही

शनिवारी सकाळी एक्सप्रेस मध्य रेल्वेच्या खडवली ते कल्याण रेल्वे स्थानकांच्या दरम्यान संगीता यांचा प्रवास सुरू असताना संगीता यांनी ते पैसे चोरीला गेले असा बहाणा रचला. ते पैसे पंजू गोस्वामी यांच्या सूचनेप्रमाणे गौतमगिरी यांना न देता स्वताच्या फायद्यासाठी वापरून अपहार केला. विश्वासाने दिलेली रक्कम संगीता यांनी स्वताच्या फायद्यासाठी वापरल्याने व्यापारी पंजू यांनी जबलपूर रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार केली. ही तक्रार आता कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात अधिक तपासासाठी वर्ग करण्यात आली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पी. सी. देशमुख या प्रकरणाचा तपास करत आहेत.