बदलापूरः वनहक्क कायद्याने मिळालेल्या शेतजमिनींवर आदिवासी बांधव नेमके काय करतात असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. आदिवासी बांधव या जमिनी विकतात, त्याचा योग्य वापर करत नाहीत, माती विकतात असेही अनेक आरोप खासगीत केले जातात. मात्र ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सरकारने दिलेल्या जमिनींवर मिश्र पिकांची शेती फुलवली आहे. विविध प्रयोगातून विविध पिके घेतली जात असून त्यामुळे येथे जैवविविधताही टिकून आहे.
अशाच आदिवासींच्या शेतीतल्या प्रयोगाची माहिती घेण्यासाठी श्रमिक मुक्ती संघटनेच्या पुढाकाराने निसर्ग मित्र शेतकरी स्पर्धा २०२५ चे आयोजन करण्यात आले होते. यात मुरबाड तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या शेतीची पाहणी करण्यात आली. त्यातून अनेक सकारात्मक बाबी समोर आल्या.
आदिवासी बांधवांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी याहेतून वनहक्क कायद्याद्वारे त्यांना शेतजमिनींचे अधिकार मिळाले. मात्र या कायद्यान्वये शेतजमिनी देण्यासाठी अनेकांचा विरोध असतो. या शेतजमिनींचा योग्य वापर केला जात नाही अशी सबब सांगितली जाते. मात्र ठाणे जिल्ह्यातील आदिवासी बांधवांनी हे आरोप खोडून काढले आहेत. इतकेच नव्हे तर आदिवासी बांधवांना शासनाने दिलेल्या शेतजमिनींवर विविध प्रयोग केले आहेत. त्यातून त्यांना वेगवेगळे धान्य तर मिळणार आहेच. पण त्यांच्या या प्रयोगामुळे जमिनींची सुपिकताही वाढणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील मुरबाड, शहापूर तालुक्यात श्रमिक मुक्ती संघटनेने आदिवासी बांधवांना शेतजमिनी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे आदिवासी बांधव त्यांच्या या जमिनींचे काय करतात याचीही पाहणी श्रमिक मुक्ती संघटनेच्या माध्यमातून त्रयस्त व्यक्तींकडून केली जाते. तसाच प्रयोग यंदाही निसर्ग मित्र शेतकरी स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवसापासून दोन तीन दिवस हे सर्वेक्षण करण्यात आले. निवृत्त पोलीस अधिकारी राजू पाटील, अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड आणि अरूंधती म्हात्रे यांनी यात महत्वाची भूमिका बजावली. त्यांनी मुरबाड तालुक्यातील विविध गावांमध्ये जाऊन आदिवासी बांधव कसत असलेल्या शेत जमिनींचे परिक्षण केले.
या स्पर्धेची घोषणा केल्यानंतर आदिवासी बांधवांनी यात सहभाग नोंदवला. अनेक ठिकाणी आदिवासी बांधवांनी शेतीत चांगले प्रयोग केले आहेत, अशी माहिती अविनाश हरड यांनी दिली आहे. यापूर्वीही स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती. त्यातून जिंकलेल्या शेतकऱ्यालाच पुढे राज्य सरकारनेही गौरविले होते. हे आमच्या स्पर्घेचे यश होते, असेही हरड म्हणाले.
आदिवासींचे प्रयोग कोणते
आदिवासी बांधवांनी शेतात वेगवेगळी पिके घेतली आहेत. यात कंदमुळे, तृणधान्यही आहेत. शाश्वत शेतीसाठी मिश्रपिके घेतली पाहिजेत हा निकष आहे. शेतकऱ्यांनीही या मिश्रपिकांचा प्रयोग शेतीत राबवला आहे. एकाच वेळी शेतात भातासोबत नाचणी, वरई आणि इतर पिके घेतली आहेत. शेजाच्याशेजारी अनेक झाडे लावली आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतात स्थानिक माड (पाम) लावला आहे. अनेक ठिकामी मोठे पक्षी आश्रयाला येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांनी पोषक वातावरण निर्माण केल्याचेही निरिक्षण परिक्षकांनी नोंदवले आहेत.
शेतीत महिलांचा सहभाग किती, त्यांचे योगदान किती हेही तपासले गेले आहे. एका शेतकऱ्याने शेतात औषधी वनस्पतीही लावल्या आहेत. काही ठिकाणच्या शेती या चांगल्या मात्र काही ठिकाणी कोरडवाहू जमिनी आहेत. सध्याच्या पावसाचा फायदा उचलून पेजवाडीजवळ पठार येथे एका शेतकऱ्याने एकाच ठिकाणी दहा पिके घेतली आहेत.