ठाणे : शहरात मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या दहा दिवसात शहरात १५ ठिकाणी विविध कारणांमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सर्वाधिक आग या इमारतीच्या विद्युतमापक खोलीला लागल्याची माहिती समोर आली आहे. तर,आगीच्या एका घटनेत दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

ठाणे शहरात दिवाळी पासून आगीच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. दिवाळी नंतरही या घटनांचे प्रमाण कायम असल्याचे दिसत आहे. शहरात २० ते २९ नोव्हेंबर या दहा दिवसाच्या कालावधीत ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन आणि ठाणे अग्निशमन विभागाकडे १५ आगीच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २७ तारखेला सर्वाधिक म्हणजेच चार ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. इमारतीच्या विद्युतमापक खोलीला आग लागल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. खोपट, वसंत विहार, राबोडी, मानपाडा, बाळकुम, हिरानंदानी इस्टेट, रामचंद्रनगर, वागळे इस्टेट, मुंब्रा आणि दिवा भागात गेल्या दहा दिवसात आगीच्या घटना घडल्या आहेत. मागील काही दिवसांपासून या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

हेही वाचा : कल्याणमधील वालधुनी नदीजवळ उड्डाण पूल; ६३९ कोटींचा प्रस्ताव ‘एमएमआरडीए’ला सादर

आगीच्या घटना कुठे घडल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
  • २० नोव्हेंबर रोजी दोन ठिकाणी आगीच्या घटना घडल्या होत्या. यामध्ये वसंतविहार येथील धर्मवीर नगर परिसरात असलेल्या एका इमारतीच्या तळ मजल्यावरील मीटर खोलीमध्ये आग लागली होती. राबोडी येथील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील एका घरामधील बालकनीमध्ये आग लागली होती.
  • २१ नोव्हेंबर रोजी बाळकुम हायलॅंड हवन येथे वाहनतळामध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला आग लागली होती. तर, मानपाडा खेवरा सर्कल जवळ कचऱ्याला आग लागली होती.
  • २२ नोव्हेंबर रोजी दिवा येथील दिवा गाव परिसरात कचऱ्याला आग लागली होती. मुंब्रा येथे एका वाहनाला बांधण्यात आलेल्या प्लास्टिकच्या ताडपत्रीला किरकोळ आग लागली होती.

हेही वाचा : VIDEO : गोष्ट असामान्यांची – गरजूंच्या पोटाची भूक शमवणाऱ्या अन्नपूर्णा उज्वला बागवाडे

  • २५ नोव्हेंबर रोजी घोडबंदर येथील वाघबीळ भागात असलेल्या एका बंगल्यातील देवघराला आग लागली होती. या घटनेत एका दाम्पत्याचा मृत्यु झाला. तर, मुंब्रा येथील कौसा भागातील मुघल पार्क इमारतीमधील भंगाराच्या दुकनात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन तीनजण जखमी झाल्याचा प्रकार घडला होता.
  • २६ नोव्हेंबर रामचंद्रनगर भागात एका दुकानाला आग लागली होती. तसेच घोडबंदर भागातील हिरानंदानी इस्टेट जवळ एका १४ मजली इमारतीच्या तळ मजल्यावरील मीटर खोलीमध्ये किरकोळ आग लागली होती.
  • २७ नोव्हेंबर खोपट येथील भानू अपार्टमेंटच्या समोर असलेल्या मैदानामध्ये उभारण्यात आलेल्या लग्नाच्या मंडपाला फटाक्यांमुळे आग लागली. दिवा खर्डी गाव येथे असलेल्या एका बंगल्यात काही घरगुती साहित्यांना आग लागली होती. यामध्ये एकाचा चेहरा किरकोळ भाजला होता. तर, मुंब्रा येथील कौसा भागातील एका इमारतीच्या मीटर खोलीला आग लागली होती. तसेच वागळे इस्टेट भागात एका दुकानाला आग लागली होती.
    -२९ नोव्हेंबर रोजी मुंब्रा येथील दर्गा गल्ली येथे असलेल्या एका इमारतीतील घरात गादीला आग लागली.