ठाणे : जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून प्रत्येक गाव आणि तालुका पातळीवर निर्धार मेळावे घेऊन त्या माध्यमातून भिवंडी लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी करणारे निलेश सांबरे यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यानिमित्ताने सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण या माध्यमांतून सर्वसामान्य घटकांनाही चांगले जीवनमान मिळावे , समाजातल्या शेवटच्या घटकांचा विकास व्हावा या हेतूने निलेश सांबरे यांनी प्रबळ इच्छाशक्तीतून २००८ साली जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेची स्थापना केली. गेल्या दोन वर्षांपासून ते भिवंडी लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. त्यासाठी त्यांनी जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून भिवंडी, वाडा , पालघर , कल्याण आणि ठाणे या ठिकाणी नुकतेच निर्धार मेळावे घेतले होते. याठिकाणी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी लोकसभा निवडणुक लढविण्याचे एकप्रकारे संकेत दिले होते. असे असतानाच आता त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा : राहुल गांधी यांना आनंद दिघे यांची भुरळ ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव होऊन या ठिकाणी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे निवडून आले आणि तेव्हापासून या परिसरात भाजपाची ताकद वाढताना दिसत आहे. परंतु हा मतदार संघ पुन्हा काबीज कर यासाठी काँगेस नेत्यांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा भिवंडी लोकसभा मतदार संघातून नेण्यात येत आहे. या यात्रेचा भिवंडी काँगेसच्या उभारीला ‘हात’ भार लागेल, असे दावे पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहेत. असे असतानाच, या यात्रेच्या मार्गावर म्हणजेच वाडा, कुडूस तसेच अन्य भागात सांबरे यांनी राहुल गांधी यांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. यानिमित्ताने सांबरे हे काँग्रेसच्या तिकिटावर भिवंडी लोकसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चेला सुरुवात झाली आहे.