Thane News: ठाणे : गायमुख घाटात दुरुस्ती कामासाठी शुक्रवार ते रविवार तीन दिवस घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्याचा निर्णय ठाणे शहर आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी घेतला असला तरी पर्यायी मार्ग हे खड्ड्यांनी भरले असून या मार्गावर प्रवास करणे अत्यंत कठीण झाले आहे. मुंबई-नाशिक महामार्ग, भिवंडी काल्हेर मार्ग, पूर्व द्रुगती महामार्ग हे पर्याय पोलिसांनी सुचवले असले तरी नागरिक पुन्हा एकदा वाहतुक कोंडीच्या विळख्यात अडकण्याची शक्यता आहे.
ठाणे जिल्ह्याला मागील काही दिवसांपासून कोंडीने ग्रासले आहे. रस्त्यांची दुरावस्था, खड्डे, एकाच वेळी सुरु असलेले प्रकल्प, पोलिसांचे ढिसाळ वाहतुक नियोजन यामुळे नागरिक त्रस्त झाले असून कोंडीमुळे अवघ्या एक तासाच्या प्रवासाला वाहन चालकांना तीन ते चार तास वाहतुक कोंडी अडकावे लागत आहे. घोडबंदर येथील गायमुख घाटात रस्त्याची दैना झाली आहे. त्यामुळे मिरा भाईंदर महापालिकेकडून या रस्त्याची दुरुस्ती केली जात आहे. मागील आठवड्यात रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. आता १५ ते १८ ऑगस्ट या कालावधीत या रस्त्याच्या डांबरिकरणाचे काम केले जाणार आहे.
ठाणे वाहतुक पोलीस आणि मिरा-भाईंदर-वसई-विरार पोलिसांनी बैठक घेऊन या मार्गावर पुन्हा एकदा अवजड वाहनांना बंदीचा निर्णय घेतला. मागील आठवड्यात या वाहतुक बदलाचा परिणाम ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना सहन करावा लागला. सलग सुट्ट्यांमुळे एकाचवेळी वाहने रस्त्यावर आल्याने तसेच रस्त्याची बिकट अवस्था यामुळे वाहतुक कोंडीत भर पडून नागरिक हवालदिल झाले होते.
आता पुन्हा एकदा प्रशासनाने सलग सुट्ट्यांच्या दिवसांत अवजड वाहनांची वाहतुक कशेळी काल्हेर, मुंबई नाशिक महामार्ग, मुंबई अहमदाबाद मार्ग, भिवंडी-वाडा, चिंचोटी मार्गे वळविली आहे. त्याचा थेट परिणाम येथील वाहतुक व्यवस्थेव बसण्याची शक्यता आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर ठिकठिकाणी रस्ते रुंदीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे दररोज भिवंडीतील अंजुरफाटा, मानकोली, खारेगाव खाडी पूलावर वाहन चालकांना कोंडीचा सामन सहन करावा लागतो. आता घोडबंदर येथील अवजड वाहनांचा भार या मार्गावर वाढणार आहे.
मुंबई अहमदाबाद मार्गे ठाण्यात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांना चिंचोटी मार्गे प्रवास करावा लागणार असून येथील रस्त्याचीही अवस्था वाईट असून हा मार्ग अरुंद असण्याचा परिणाम वाहन चालकांना सहन करावा लागेल. तर भिवंडी-वाडा या मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गवरील खड्ड्यांमुळे एका तरुणाला नुकताच जीव गमवावा लागला असून आता अवजड वाहनांचा भार वाढल्यास नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गावरही या वाहतुक बदलाचा परिणाम जाणवेल. मुंब्रा बाह्यवळण मार्गे मुंबई नाशिक महामार्गाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांचा भार येऊन मुंब्रा बाह्यवळण, शिळफाटा मार्गावर वाहतुकी कोंडीचा परिणाम होऊ शकतो.
स्वातंत्र्यदिन, दहीहंडी आणि रविवार असे सलग तीन दिवस सुट्ट्यांचे असल्याने नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनांचा भार रस्त्यावर येऊन जिल्ह्यातील सर्वच मार्गावर कोंडीची शक्यता व्यक्त केली जाते.
प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुरुस्तीची कामे करण्याऐवजी अवजड वाहनांची वाहतुक एक ते दोन दिवस सर्वच मार्गावर बंद करून दुरुस्ती कामे केली तर ही कामे लवकर पूर्ण होतील. अन्यथा खड्ड्यांमुळे कोंडी कायम राहील. प्रशासनाने या समस्येकडे लक्ष घालणे आवश्यक आहे. – रुपेश भोईर, प्रवासी.