ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारे आणि राज्य सरकारच्या विविध प्राधिकरणांच्या अख्यारित असलेल्या महामार्गांसह त्यावरील उड्डाणपुलांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतूकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत असून त्याचबरोबर खड्डयांमध्ये वाहन आदळून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातून मुंबई-नाशिक महामार्ग तसेच घोडबंदर मार्ग जातो. हे दोन्ही मार्ग शहरातील अंतर्गत मार्गांना जोडण्यात आलेले आहेत. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुल सार्वजनिक बांधकाम विभाग तर, पुलाखालील रस्ता मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाच्या अखत्यारित येतो. या मार्गांवर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात.

यंदाही हे चित्र कायम असल्याचे दिसून येत आहे. पावसाळ्यात खड्डे पडू नयेत म्हणून संबंधित प्राधिकरणांनी काही ठिकाणी रस्त्यांची डागडुजीचे काम हाती घेतले होते. मात्र, मे महिन्यातच सुरू झालेल्या पावसामुळे हि कामे रखडली होती. यामध्ये गायमुख येथील ठाण्याहून फाउंटनच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेची दुरुस्ती केली होती. तर, फाऊंटन येथून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेचे काम रखडले आहे. माजिवाडा पुलावरील मुंबई मार्गिकेचे काम अर्धवट झाले आहे. असे असतानाच, गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पातलीपाडा, वाघबीळ, माजिवडा या पुलांवर मोठे खड्डे पडले असून त्यात रिक्षा किंवा स्कुटरचे चाक अडकून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे.

याशिवाय, कार आणि अवजड वाहनेही खड्ड्यात आदळत असून अवजड वाहने उलटून अपघात होण्याची भिती व्यक्त होत आहे. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साठते आणि त्यामुळे वाहनचालकास ते दिसून येत नाही. यामुळे वाहने त्याठिकाणी आदळतात. घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ते जोडणीसाठी खोदकामे सुरू आहेत. त्यातच काही ठिकाणी मास्टीक पद्धतीने तयार केलेला रस्ता उंच-सखल झाला आहे. या रस्त्यावरून दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवेळी अवजड वाहतूक आणि त्यात खड्डे

ठाणे महापालिका क्षेत्रातून जाणारा मुंबई-नाशिक महमार्ग आणि घोडबंदर मार्ग हे मुंबई, पालघर, गुजरात, नाशिक आणि उरण येथील वाहतूकीसाठी महत्वाचे मानले जातात. या मार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असते. शहरात सकाळ आणि सायंकाळी गर्दिच्या वेळेत अवजड वाहतूकीमुळे कोंडी होऊन त्याचा फटका शहरवासियांना बसू नये यासाठी अवजड वाहतूकीसाठी वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. यानुसार रात्री ११ ते पहाटे ५ आणि दुपारी १२ ते ४ या वेळेत अवजड वाहतूकीला परवानगी असली तरी या वेळे व्यतिरिक्त म्हणजेच, सकाळ आणि सायंकाळच्या वेळेतही अवजड वाहतूक सुरू असते. यामुळे कोंडी होते. त्यातच महामार्गांवर खड्डे पडल्याने वाहनांचा वेग मंदावून कोंडीत भर पडते.