Ganeshotsav 2025, Gauri Aagman ठाणे: जिल्ह्यात गणपतीचे वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात आगमन झाल्यानंतर, आज गौरींचे आगमन होत आहे. ठाणे जिल्ह्यात १५ हजार ३२७ गौरींचे आगमन होणार आहे. यामध्ये सर्वाधिक ६ हजार ५०२ गौरींचे कल्याण-डोंबिवली शहरात आगमन होणार आहे.

यंदा २७ ऑगस्ट रोजी गणपतीचे आगमन झाले. ठाणे जिल्ह्यात १ लाख ५७ हजार ८४२ गणपतीची उत्साहात प्रतिष्ठापना झाली. त्यापाठोपाठ, रविवारी गौरीचे आगमन होत आहे. गौरी आगमन हा गणेशोत्सवातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि भावनिक क्षण असतो. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर यंदा पाचव्या दिवशी म्हणजे गौरींचे आगमन होत आहे. काही ठिकाणी त्याला ‘गौरी आवाहन’, ‘गौरी पूजन’ किंवा ‘गौरी आगमन’ असेही म्हटले जाते.

हिंदू परंपरेनुसार, गौरी म्हणजे माता पार्वती, ज्यांना सुख, सौभाग्य, समृद्धी आणि घरातले मंगल वातावरण यांचं प्रतीक मानले जाते. या गौरीचे आगमन गणेशोत्सवाच्या काळात होते. ३१ ऑगस्ट, रविवारी सायंकाळी ५ वाजून २५ मिनीटापर्यंत चंद्र अनुराधा नक्षत्र असताना गौरींचे आगमन होणार आहे. सोमवार १ सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरींचे पूजन होणार आहे.

ठाणे जिल्ह्यात गौरीचे धुमधडाक्यात आगमन होण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात १५ हजार ३२७ गौरीचे आगमन आगमन होणार आहे. यामध्ये सर्वाधिक कल्याण शहरातील ६ हजार ५०२, त्यापाठोपाठ उल्हासनगर- ४ हजार ४८५, ठाणे शहरात ३ हजार ४५२ आणि भिवंडीत ८८८ गौरींचा समावेश आहे. या आगमनानंतर गौराई मातेचे सोमवारी पूजन होणार असून मंगळवारी त्या परतीच्या प्रवासाला म्हणजे विधीवत विसर्जन होणार आहे.