Anant Chaturdashi 2025, Thane: ठाणे : अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन पार पडले. मुंबई ठाणे सह या विसर्जनाला पावसाची हजेरी पाहायला मिळाली. ठाणे शहरात शनिवारी सकाळ पासून संततधार पाऊस होता तरी अधून मधून पावसाचा जोर वाढत होता. असे असतानाही गणेश भक्तांचा उत्साह कुठेही कमी झाला नाही. सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणपती विसर्जन च्या देखील वाजत गाजत मिरवणूका निघाल्या होत्या. गणपतीचे विसर्जन निर्विघ्न पार पाडण्यासाठी ठाणे शहरातील प्रत्येक ठिकाणी पोलीस प्रशासन, महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर यंत्रणा सज्ज झाल्या होत्या.
ठाणे शहरातील घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजेच शनिवारी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी ढोल-ताशा, डीजे, लेझीम अशा विविध प्रकारच्या मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांसह तसेच विशेष संकल्पना घेऊन मिरवणूक काढल्याचे दिसून आले. यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवनचरित्र उलगडून सांगणाऱ्या मिरवणूकीचा देखील समावेश होता. तर, लोकमान्य नगर परिसरातील बाजारपेठेत सामाजिक संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. गणपती मिरवणुकीत असलेल्या प्रत्येकाचे लक्ष या फलकांकडे पडत होते.
परंतु शनिवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला होता. त्यामुळे असा पाऊस संध्याकाळी देखील कायम राहिला तर, मिरवणूका काढायच्या कशा अशी चिंता सर्वांनाच वाटू लागली होती. संध्याकाळी ६ वाजताच्या नंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला तेव्हा बहुतांश मंडळानी गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात केल्याचे दिसून आले. रात्री १२ वाजल्यानंतर देखील या मिरवणूका सुरु असल्याचे पाहायला मिळाले.
ठाणे महापालिकेकडून कृत्रिम तलाव, तसेच नैसर्गिक विसर्जन घाटांवर आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्यात आली होती. साफसफाई, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन सेवांसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. तसेच विसर्जनाच्या स्थळांवर सुरक्षा आणि नियंत्रण राखण्यासाठी पोलीस दलाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महापालिका प्रशासनाकडूनही विसर्जन घाट परिसरात आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन दलाच्या जवानांना तैनात करण्यात आले होते. घाटावर प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. ठाणे महापालिका क्षेत्रात रात्री १२ वाजेपर्यंत २ हजार ५८ घरगुती गणपती तर, ६३२ सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाले असल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.