ठाणे : मनसेचे पदाधिकारी जमील शेख यांच्या पत्नी खुषनुमा शेख यांनी केलेले आरोप फेटाळून लावत माझ्याविरोधात खोटी माहिती देऊन बदनामी काहीजण करत असल्याचे राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते नजीब मुल्ला यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी आसोमा याने हत्येप्रकरणात माझे नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफित मुल्ला यांनी यावेळी दाखविली. मला बदनाम करण्यासाठी घाणेरडे राजकारण सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.
राबोडी परिसरातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची सुमारे पाच वर्षांपूर्वी हत्या झाली होती. जमील शेख यांच्या पत्नी खुषनुमा शेख यांनी मंगळवारी राबोडी येथे पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते नजीब मुल्ला यांच्यावर गंभीर आरोप केले होते. तसेच त्यांनी याप्रकरणातील आरोपी ओसामा याची एक चित्रफीत सादर केली होती. त्यात नजीब मुल्ला यांनी हत्येची सुपारी दिल्याचे याप्रकरणातील आरोपी ओसामा हा सांगत असल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, बुधवारी नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेत खुषनुमा यांचे आरोप फेटाळून लावले. मी मुस्लिम समाजाचा नेता बनत आहे. हे एका व्यक्तीला पाहावत नाही. माझे नेतृत्त्व संपविण्यासाठी हा प्रकार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
जमील शेख यांच्या पत्नीने जी चित्रफित दाखविली आहे, त्यात ओसामा यांनी ज्यांचे नाव घेतले आहे, ती व्यक्ती पत्रकार परिषदेवेळी खुषनुमा यांच्या बाजूला उभी होती, असा दावा मुल्ला यांनी केला. जमील यांची हत्या करणाऱ्या एका आरोपीला भेटण्यासाठी जमील यांचे कुटुंबिय रुग्णालयात गेले होते. जमील यांना मारणाऱ्याला त्याचे कुटुंब कसे भेटते असा प्रश्न मुल्ला यांनी उपस्थित केला. तसेच २०२४ मध्ये मी कळवा मुंब्रा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवू नये यासाठी माझ्याविरोधातील खोटी माहिती मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली होती. त्यामुळे न्यायालयाने त्यांना २५ हजार रुपये दंड आकारला होता, असा दावाही मुल्ला यांनी केला.
जमील शेख यांच्या कुटुंबियांनी राजकारणाचे शिकार होऊ नये. असे परत झाल्यास आम्ही अब्रूनुकसानाच्या दाव्याची प्रक्रिया सुरु करू असा इशारा मुल्ला यांनी दिला. मी आरोपी आहे, गुन्हेगार आहे असे चित्र तयार केले जात आहे. ठाण्यात केवळ एकाच व्यक्तीमुळे घाणेरडे राजकारण सुरु आहे, असेही ते म्हणाले. माझ्याकडून पैसे उकळण्यासाठी आरोपी आसोमा याने माझे नाव घेतल्याचा दावा करत त्यासंबंधीची चित्रफित मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत दाखविली.