ठाणे : ठाणे लोकसभा मतदार संघाच्या जागेवरून शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच, भाजपने ठाणे शहरात तीन मजली प्रशस्त कार्यालय उभारले आहे. रेमंड कंपनीच्या परिसरातील सुमारे १५ हजार चौरस फुट जागेत हे कार्यालय उभारण्यात आले असून त्याचे काम पुर्ण झाल्याने ते लोकापर्णासाठी सज्ज झाले आहे. लोकसभा निवडणुक आचारसंहितेपुर्वी म्हणजेच येत्या काही दिवसांत या कार्यालयाचे लोकार्पण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

भाजपचे सुरूवातीला ठाणे स्थानक परिसरात कार्यालय होते. मात्र, २०१४ नंतर केंद्र आणि राज्यात सत्तेवर आल्यानंतर भाजप पक्ष मजबुत होऊ लागला. पालिका निवडणुकीत इतर पक्षातील लोकप्रतिनिधींनी भाजपत प्रवेश केला. यामुळे ठाणे शहरातही भाजपची ताकद वाढली. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संख्या वाढल्याने स्थानक परिसरातील कार्यालय अपुरे पडू लागले आणि त्यानंतर २०१७ मध्ये महापालिका निवडणुक काळात भाजपने खोपट परिसरात कार्यालय उभारले. परंतु गेल्या काही वर्षांपासून हे कार्यालयही अपुरे पडू लागले आहे. कार्यालयात एकाचवेळी ४० ते ५० कार्यकर्ते जमल्यास गर्दी होत होती. तसेच कार्यालयाबाहेर वाहनतळ देखील नव्हते. मंत्री किंवा भाजपचे नेते पदाधिकारी कार्यालयात आल्यास वाहतुकीस अडथळा येत होता. यामुळे भाजपच्या प्रदेश स्तरावरून ठाण्याच्या कार्यालयासाठी वर्तकनगर भागातील रेमंड कंपनी परिसरात जागा घेण्यात आली. येथील सुमारे १५ हजार चौरस फूट जागेत भाजपने नवे कार्यालय उभारण्यात आलेले आहे. या कार्यालयाचे काम जवळपास पूर्ण झाले आहेे. देशभरात पक्षाचा विस्तार व्हावा या उद्देशातून भाजपने सर्वच शहरांमध्ये प्रशस्त जनसंपर्क कार्यालये उभारण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने ठाणे शहरातही भाजपने प्रशस्त कार्यालय उभारले असून हे कार्यालय उभारण्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान असल्याचे बोलले जात आहे. वर्तकनगर येथील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी उभारण्यात आलेले हे कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हेही वाचा… कल्याण-भिवंडी-उल्हासनगरसाठी संयुक्त परिवहन सेवा

हेही वाचा… ठाण्यामध्ये महायुतीत धुसफूस; निवडणुकीच्या तोंडावर नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्तकनगर येथील रेमंड कंपनीजवळ सुमारे १५ हजार चौ. फूट जागेत हे कार्यालय उभारण्यात आले असून या कार्यालयाचे जवळपास सर्व काम पूर्ण झाले आहे. या कार्यालयात १९ उप-कार्यालये आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र कार्यालये आहेत. सुमारे १०० ते १५० पदाधिकारी बसतील इतके मोठे सभागृह तसेच प्रशस्त भुयारी वाहनतळ आहे. ठाणे शहरात एखाद्या पक्षाचे इतके मोठे कार्यालय पहिल्यांदाच उभे राहिल्याने हे कार्यालय सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. लवकरच या कार्यालयाचे लोकार्पण होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.