ठाणे : घोडबंदर येथील एका खासगी रुग्णालयाला बाॅम्बने उडविण्याची धमकी इ-मेलद्वारे देण्यात आली आहे. हैदराबादमधील लैंगिक अत्याचार पिडीतेला, हुंडाबळीला न्याय देण्यासाठी आम्ही बाॅम्ब हल्ल्यात रुग्णांना मारणार आहोत. पोलीस झोपले आहेत, रुग्णांना मारल्यानंतरच त्या प्रकरणाचा तपास सुरु होईल असे इ-मेलमध्ये म्हटले आहे. या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खोडसाळपणे करण्यात आल्याचा संशय आहे असे पोलिसांनी सांगितले.
घोडबंदर भागात खासगी रुग्णालय आहे. दोन दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या इ-मेल खात्यावर दोन संदेश प्राप्त झाले. त्यामध्ये २०२३ च्या एका प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. यामध्ये एका तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचे तसेच हुंडाबळीचे प्रकरण असल्याचे लिहीले आहे. पोलीस याप्रकरणाचा तपास करत नाहीत असेही या संदेशामध्ये म्हटले आहे. रुग्णांना मारल्यानंतरच प्रकरणाचा तपास सुरु होईल, तुमच्या रुग्णांना वाचवू शकाल तर वाचवा असाही उल्लेख यात आहे.
या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे, कासारवडवली पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० चे कलम ६६ (क), भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३५१ (३), ३५१ (४), ३५३ (१)(ब) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार खोडसाळपणा असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.