ठाणे : ठाणे- भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेच्या निर्माणाचे काम भिवंडी शहरात सुरू आहे. या कामासाठी भिवंडी येथील धामणकर नाका भागात ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहे. हे वाहतुक बदल आज, रविवारी रात्री ११ ते सोमवारी पहाटे पाच आणि सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे पाच यावेळेत लागू असतील.

ठाणे, भिवंडी शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्गिकेचे जाळे उभारले जात आहे. कल्याण, भिवंडीहून हजारो नागरिक रस्ते मार्गाने ठाणे शहरात वाहतुक करत असतात. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी ठाणे- भिवंडी- कल्याण या मेट्रो पाच मार्गिकेच्या निर्माणाचे काम सध्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ठाणे आणि भिवंडी शहरात सुरू आहे. आजपासून मध्यरात्री भिवंडी येथील धामणकर नाका भागात तुळई उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे ठाणे वाहतुक पोलिसांनी वाहतुक बदल लागू केले आहे.

वाहतुक बदल असे आहेत

  • नारपोली, मानकोली येथून कल्याण नाकाच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या वाहनांना अंजुरफाटा चौक येथे प्रवेशबंदी असेल. येथील जड-अवजड वाहने अंजुरफाटा चौकातून वळण घेऊन वाहतुक करतील. तर हलकी वाहने रतन सिनेमा येथून डावे वळण घेऊन वाहतुक करतील.
  • कल्याणनाका येथून नारपोली, मानकोलीच्या दिशेने वाहतुक करणाऱ्या जड अवजड वाहनांना धामणकर नाका भागात प्रवेशबंदी असेल. येथील वाहने कल्याणनाका येथून डावे वळण घेऊन खडी मशीन मार्गे वाहतुक करतील.

हे वाहतुक बदल आज, रविवारी रात्री ११ ते सोमवारी पहाटे पाच आणि सोमवारी रात्री ११ ते मंगळवारी पहाटे पाच यावेळेत लागू असतील.