बदलापूरः ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण कोकण परिसरात गेल्या आठवड्यात झालेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसामुळे भात पिकाचे प्रचंड नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक दिलासा देण्यात यावा, अशी ठाम मागणी मुरबाड विधानसभा मतदारसंघाच आमदार किसन कथोरे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. त्यांनी या संदर्भात राज्याचे मुख्य सचिव यांनाही सविस्तर निवेदन सादर केले असून, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याचे आवाहन केले आहे. मुरबाड, शहापूर, अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यात शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

यंदा ठाणे जिल्ह्यासह कोकण विभागात भात लागवडीसाठी अनुकूल वातावरण होते. शेतकऱ्यांनी मेहनतीने शेती केली आणि बहुतेक ठिकाणी भात पिके कापणीच्या अवस्थेत पोहोचली होती. मात्र १९ ते २५ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या अवकाळी आणि परतीच्या पावसाने या मेहनतीवर अक्षरशः पाणी फेरले. अनेक शेतकऱ्यांनी शेतात कापून ठेवलेले भात पिक पूर्णपणे भिजून गेले, तर काही ठिकाणी पाण्याखाली गेले. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणाऱ्या शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. त्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे, अशी भूमिका आमदार कथोरे यांनी आपल्या पत्रात मांडली आहे.

यापूर्वी अतिवृष्टीमुळेही अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. आता परतीच्या पावसाने त्या नुकसानीवर दुहेरी घाव घातला आहे. एकीकडे शेतीचे उत्पादन कोसळले आहे, तर दुसरीकडे बाजारात दरही कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकरी अक्षरशः हवालदिल झाला असून, कर्जबाजारीपणाचे संकट पुन्हा डोके वर काढत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार किसन कथोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिवांना दिलेल्या निवेदनात दिलासा देण्याची मागणी केली आहे. ठाणे जिल्हा आणि संपूर्ण कोकण विभागातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करण्यात यावेत. झालेल्या नुकसानीचा अंदाज घेऊन तत्काळ आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई दिली जावी. भाताबरोबरच इतर हंगामी पिकांचेही नुकसान लक्षात घेऊन विशेष पुनरावलोकन अहवाल तयार करण्यात यावा, अशी मागणी कथोरेंची आहे.

दरम्यान, कृषी विभागाने काही ठिकाणी प्राथमिक पंचनामे सुरू केल्याची माहिती मिळाली असली तरी सर्वच तालुक्यांत ती वेळेत पूर्ण होण्याची गरज आहे. त्यामुळे आमदारांच्या हस्तक्षेपानंतर आता या कार्यवाहीला वेग मिळण्याची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच मदतही वेळेत मिळाल्यास त्याचा फायदा होईल, अशीही शेतकऱ्यांची भूमिका आहे.