सर्दी, खोकला, तापाच्या रुग्णांत वाढ; करोनाबाधित, सामान्य रुग्ण यांत फरक करणे कठीण

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे/बदलापूर :  दोन दिवसांपूर्वी झालेला अवकाळी पाऊस आणि त्यापाठोपाठ आलेली थंडीची लाट यांमुळे सध्याच्या ‘करोनाभीती’त भर पाडली आहे. ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांचे किमान तापमान १२ अंश सेल्सियसपर्यंत घसरले आहे. अचानक झालेल्या हवामानबदलामुळे सर्दी, तापाचे रुग्ण वाढले आहेत. मात्र करोनामध्येही हीच लक्षणे आढळत असल्याने करोना आणि सामान्य आजार यांच्यात फरक करणे कठीण झाले आहेत. त्यातच अनेक रुग्ण लक्षणे असल्यास चाचणी न करताच खासगी डॉक्टरांकडून उपचार घेत असल्याचे आढळून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून घसरलेल्या या पाऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात थंडी आणि अवकाळी पावसानंतर सर्दी, खोकला, ताप, अंगदुखीच्या रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अनेक रुग्ण कौटुंबिक डॉक्टर किंवा खासगी दवाखान्यांत जाऊन यावर औषधोपचार घेऊ लागले आहेत. मात्र त्यामध्ये करोनाची लागण झालेले रुग्ण असण्याचा धोकाही वाढला आहे. दुसरीकडे, अशी लक्षणे दिसू लागताच आपल्यालाही करोनाची बाधा झाली, या भीतीने सामान्य तापाचे रुग्णही धास्तावू लागले आहेत. 

जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर ६ ते १० जानेवारी या कालावधीत दिवसाला ७ ते ९ हजार करोना रुग्ण आढळून आले. यापूर्वी त्याचे प्रमाण पाच हजारहून कमी होते. त्यामुळे जिल्ह्यात रुग्णवाढ कायम असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांत ठाणे जिल्ह्यामध्ये करोना चाचण्यांची संख्या दिवसाला सुमारे ५० हजार इतकी आहे. सर्वाधिक करोना रुग्णसंख्या ही ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि मीरा-भाईंदर येथे आढळून आले आहेत. या भागातील बहुतांश रुग्ण हे घरीच उपचार घेत आहेत.

तापमानात घट

ठाणे जिल्ह्यात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यापूर्वी दिवसभर आकाशात मळभ होते. त्यानंतर तापमानातही मोठी घट झाली. जिल्ह्यातील सर्वात कमी तापमान बदलापुरात नोंदवले गेले. यंदाच्या हिवाळी मोसमात सोमवारी बदलापुरात कधी नव्हे ते जिल्ह्यातील नीच्चांकी तापमान नोंदवले  गेले. बदलापुरातील पारा ९ अंशावर घसरला होता. तर कल्याण- डोंबिवली शहरात पारा १०, ठाणे १२, नवी मुंबई १३.५ पर्यंत खाली गेला होता.  मंगळवारीही बदलापुरात १२, कल्याणझ्र् डोंबिवलीत १३.२, ठाणे  आणि  नवी मुंबईत १५ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले.

गेल्या काही दिवसांपासून थंडी वाढली आहे. त्यामुळे सर्दी, खोकल्याचे रुग्णही वाढू लागले आहेत. करोना रुग्णामध्येही सारखीच लक्षणे असतात. त्यामुळे करोना आहे की सर्दी, खोकल्याचा आजार आहे, याची माहिती नागरिकांना मिळत नाही. नागरिकांनी चाचणी केल्यास त्याचा अहवाल त्याला मिळून करोना आहे की नाही हे स्पष्ट होईल. तसेच करोनाचा प्रसार रोखण्यासही मदत होणार आहे. 

– डॉ. कैलाश पवार, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक.

मागील दोन दिवसापासून थंडी वाढली असल्यामुळे सर्दी, खोकला आणि तापाची साथ पसरलेली दिसून येत आहे. सध्या दवाखान्यात दिवसाला १०० ते १५० रुग्ण उपचारासाठी येत आहेत. करोनाची लक्षणेही हीच असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र या वातावरणात नागरिकांनी उत्तम आहार घेणे गरजेचे असून रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याकडे लक्ष दिले पाहिजे.

– डॉ. नंदकुमार ठाकूर , कोपरी.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase anxiety cold patients corona ysh
First published on: 12-01-2022 at 01:59 IST