बदलापूर नगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत रोज नव्याने घडणाऱ्या प्रशासकीय घोळांमध्ये पुन्हा एकदा पालिका प्रशासनाला फटका बसला असून उमेदवारांच्या अर्ज छाननीत अपात्र ठरविण्यात आलेल्या उमेदवारांना कल्याण येथील सत्र न्यायालयाने पात्र ठरविले आहे.
कुळगाव बदलापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यांपैकी २० जणांना उमेदवारी अर्ज छाननीत बाद ठरविण्यात आले होते. जात वैधता पडताळणी प्रमाणपत्राच्या मुद्दय़ांवरून तसेच अर्ज भरताना एका उमेदवाराने शिक्षणाचा रकाना रिकामा सोडल्याने अपात्र ठरविण्यात आले होते. या निर्णयांविरोधात आठ जणांनी कल्याण सत्र न्यायालयात अपील केले होते. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन उमेदवार, तर भारिप बहुजन महासंघाचा एक उमेदवार असून अन्य चार अपक्ष आहेत. न्यायालयाने या सगळ्यांचे अर्ज वैध ठरविले असून ते निवडणुकीसाठी पात्र ठरलेले आहेत. यात राष्ट्रवादीच्या पल्लवी कारळे प्रभाग क्र. १३, सपना मेहेर प्रभाग क्र. २४, ललिता जाधव प्रभाग क्र. ३४ आदी उमेदवार व भारिप बहुजन महासंघाचे प्रभाग क्रमांक २३चे दत्ता गायकवाड व अन्य अपक्ष आता निवडणूक रिंगणात परत आले आहेत.
पुन्हा निवडणूक प्रक्रिया
न्यायालयात गेलेले आठही उमेदवार पात्र ठरल्याने त्यांच्यासाठी पालिका प्रशासन पुन्हा निवडणूक प्रक्रिया राबवणार आहे. या आठही उमेदवारांना १३ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दिली होती, तर १४ एप्रिलला यांना निवडणूक चिन्हाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिकेने एकच प्रक्रिया घोळामुळे पुन्हा राबविण्याचा प्रकार कायम राखला आहे.
निकालाआधी प्रक्रिया?
पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना न्यायालयाने दिलेल्या निकालपत्राबाबत विचारले असता, निकालपत्र हातात पडले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले; परंतु निकालपत्र हाती पडण्याआधीच या आठ उमेदवारांसाठी निवडणूक प्रक्रिया पुन्हा कशी सुरू झाली याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे याआधीही प्रभाग आरक्षण सोडतीचा घोळ व मतदारयांद्यावरून प्रशासकीय ढिलाई प्रकाशात आली होती.
भाजपच्या आनंदावर विरजण
राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक ३४ च्या उमेदवार ललिता जाधव यांचा उमेदवारी अर्ज न्यायालयाने अपात्र ठरविला होता. त्यामुळे येथील भाजपच्या उमेदवार वैशाली गीते यांची जागा ही बिनविरोध झाली होती; परंतु न्यायालयाने जाधव यांना पात्र ठरविल्यानंतर त्या पुन्हा निवडणूक रिंगणात आल्या असल्याने भाजपच्या आनंदावर विरजण पडले आहे. उमेदवारी अर्ज छाननीत एकूण २० उमेदवार अपात्र ठरविण्यात आले होते. यातील बहुतांश उमेदवार हे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केल्याच्या मुद्दय़ावर अपात्र ठरले होते; परंतु यापैकी आठ उमेदवार न्यायालयात अपिलात गेल्याने ते पात्र ठरले, परंतु अन्य उमेदवार अपिलांत न गेल्याने ते अपात्रच राहिले आहेत.