किशोर कोकणे
ठाणे : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीची झळ मालवाहतूकदारांना बसू लागल्याने काही अवजड मालवाहतूकदार संघटनांनी व्यापारी, कंपन्यांकडे मालवाहतुकीच्या दरात २५ टक्क्यांची वाढ करावी अशी मागणी लावून धरली आहे. इंधनाचे दर वाढत असताना आहे त्या दरांमध्ये वाहतूक करणे शक्य नसल्याची भूमिका या संघटनांनी मांडली असून अजूनही कंपन्या तसेच व्यापाऱ्यांनी या दरवाढीला परवानगी दिलेली नाही.
गेल्या काही महिन्यांपासून इंधनाची दरवाढ होत आहे. गेल्या आठवडय़ापासून ही दरवाढ सलग होताना दिसून आली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी हे गोदामाचे शहर आहे. त्यामुळे दररोज हजारो अवजड वाहने भिवंडी येथून गुजरात किंवा उरण जेएनपीटीच्या दिशेने वाहतूक करत असतात. उरण जेएनपीटी ते गुजरातच्या दिशेने वाहतूक करणाऱ्या मध्यम आकाराच्या कंटेनरसाठी पूर्वी इंधन खर्च आणि टोल खर्च मिळून वाहतूकदारांना दररोज फेरीसाठी १५ ते १६ हजार मोजावे लागत होते. त्या मालवाहतूकदारांना आता फेरीला १८ हजार रुपयांच्या घरात पैसे मोजावे लागत असल्याचे मालवाहतूकदारांनी सांगितले. याचा परिणाम थेट मालवाहतूकदारांना बसू लागला आहे.
मालवाहतुकीत वाढ झाली असली करोनाच्या प्रादुर्भावामुळे आणि वस्तू सेवा करामुळे आधीच संकटात सापडलेल्या मालवाहतूकदारांनी अत्यंत कमी नफ्यामध्ये हा व्यवसाय सुरूच ठेवला होता. परंतु दररोज होणाऱ्या या दरवाढीमुळे आता मालवाहतूकदारांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून डिझेल, वाहनासाठी लागणारे साहित्य, वाहन विम्याचे हप्ते यामध्ये वाढ झालेली आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम अवजड वाहन मालवाहतूक करणाऱ्या मालकांना बसत आहे. राज्यातील मालवाहतूकदारांची संघटना असलेल्या महाराष्ट्र अवजड वाहन आणि आंतरराज्य कंटेनर ऑपरेटर संघटनेने आता कंपन्यांना वाहतुकीचे दर २५ टक्क्यांनी वाढविण्याची विनंती केली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मालवाहतुकीच्या दरामध्ये वाढ होऊन त्याचा प्रत्यक्ष परिणाम वस्तूंच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे.
दरवाढ अटळ ?
उरण जेएनपीटीहून गुजरात, भिवंडीच्या दिशेने लोखंड, स्टील, गृहोपयोगी वस्तू, रसायने, कपडे अशा सर्वच प्रकारचा माल वाहतूक होत असतो. त्यामुळे इंधन दरवाढ सतत होत राहिली तर वाहतुकीचा खर्च वाढणे अपरिहार्य होऊन बसते. तसेच झाल्यास या वस्तूंचाही दर वाढण्याची दाट शक्यता असते. यापूर्वी झालेल्या इंधनवाढीनंतर टप्प्याटप्प्याने या वस्तूंचे दर वाढत जातात असा अनुभव आहे. वाहतूकदारांनी २५ टक्के दरवाढीची मागणी व्यापारी तसेच कंपन्यांकडून सुरू केल्याने या वस्तूंची दरवाढ अटळ असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मालवाहतूकदारांना इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत आहे. अद्याप आम्ही वाहतुकीचा खर्च वाढविला नाही. दररोज होणाऱ्या या इंधन दरवाढीमुळे आम्हाला आता नफा मिळणे कठीण झालेले आहे. इंधन दरवाढ त्यात कर्मचाऱ्यांचे वेतन, इतर खर्च या बाबी आता परवडत नाहीत. त्यामुळे आम्ही कंपन्यांकडे वाहतुकीचा खर्च वाढविण्याची विनंती केली आहे. – प्रवीण पैठणकर, अध्यक्ष, महाराष्ट्र अवजड वाहन आणि आंतरराज्य कंटेनर ऑपरेटर संघटना.
संग्रहित लेख, दिनांक 30th Mar 2022 रोजी प्रकाशित
इंधन दरवाढीमुळे महागाईच्या झळा? वाहतूकदार चिंतेत, दरवाढीची मागणी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या इंधन दरवाढीची झळ मालवाहतूकदारांना बसू लागल्याने काही अवजड मालवाहतूकदार संघटनांनी व्यापारी, कंपन्यांकडे मालवाहतुकीच्या दरात २५ टक्क्यांची वाढ करावी अशी मागणी लावून धरली आहे
Written by किशोर कोकणे

First published on: 30-03-2022 at 01:44 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflation hit fuel price hike transporters worried demand price hike traders by heavy freight associations freight merchants amy