ठाणे: आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रभाग स्तरावर आणि मुख्यालयस्तरावर २४ तास मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवाव्यात. पुढील चार महिने कोणीही रजेवर जाऊ नये. तसेच, मुख्यालय सोडण्यापुर्वी परवानगी घेण्यात यावी असे निर्देश भिवंडी महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांनी अधिकाऱ्यांना दिले.
येत्या पावसाळ्यात संभाव्य घटना आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवारी भिवंडी महापालिकेचे आयुक्त अनमोल सागर यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महापालिका, पोलीस, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
आयुक्तांनी प्रामुख्याने धोकादायक इमारती, पूर परिस्थती निर्माण होणाऱ्या क्षेत्राचा आढावा घेतला. तसे नागरीकांना स्थलांतरीत करण्याची वेळ आल्यास त्यांची पर्यायी व्यवस्था, वाहतुक कोंडी होऊ नये म्हणुन उपाययोजना, कचरा साठुन दुर्गंधी व रोगराई पसरु नये याकरिता आरोग्य विभागाकडून करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा बैठकीमध्ये घेण्यात आला. रस्त्याची विकास कामे कोणत्याही परिस्थितीत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या.
प्रभाग कार्यालय, मुख्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागातील सर्व दुरध्वनी क्रमांक सुरू आहेत आणि पुढील सर्व काळ सुरू राहतील याची खबरदारी आपत्ती व्यवस्थापन प्रमुख यांनी घ्यावी. कोणत्याही परिस्थतीमध्ये दुरध्वनी बंद राहता कामा नये. वैद्यकीय आरोग्य विभागाने आपत्कालीन परिस्थतीसाठी एक आपत्कालीन कक्ष सुरू करावा. तसेच, सर्व प्रकारच्या साथीचे आजार, अपघात घडल्यास त्यावर आवश्यक त्या सर्व औषधांचा साठा मुबलक प्रमाणात करण्यात यावा अशा सूचना आयुक्तांनी दिल्या.
एखाद्या ठिकाणी पाणी साचून त्या ठिकाणी विद्युत प्रवाह पाण्यात प्रवाहीत झाल्यास टोरेंट कंपनीने तातडीने कारवाई करुन त्या भागातील विद्युत पुरवठा बंद करावा असेही आयुक्तांनी सांगितले.प्रभाग अधिकाऱ्यांनी शहरामध्ये २७ ठिकाणी पुर परिस्थती निर्माण होणाऱ्या स्थानांची यादी निश्चित केली आहे. या ठिकाणी पुर परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने जवळपासच्या समाज कार्यालय, शाळा येथे नागरीकांना स्थलांतरीत करुन त्यांच्या निवासाची व जेवणाची व्यवस्था करावी असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्व यंत्रणांच्या प्रमुखांनी या पुढील काळामध्ये एकमेकांशी सातत्याने समन्वय साधुन हे काम पार पाडावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.