ठाणे : येत्या आंबिया बहारामध्ये हवामानातील अनिश्चिततेमुळे आंबा फळपिकाचे नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी कृषी विभागाने पुनर्रचित हवामानाधारित फळपिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३० नोव्हेंबर २०२५ ही अंतिम मुदत आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचें यांनी सांगितले आहे. या योजनेअंतर्गत अवेळी पाऊस, कमी – जास्त तापमान, वेगाचा वारा व गारपीट यांसारख्या हवामान धोक्यांमुळे नुकसान झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई दिली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज नोंदवून आपल्या उत्पादनक्षम आंबा फळबागांना संरक्षण सुनिश्चित करावे.
ठाणे जिल्ह्यासह राज्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी विविध उपायोजना राबविण्यात येत आहेत. याच अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षा देण्यासाठी कृषी विभागाने पुनर्रचित हवामानाधारित फळपिक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील अधिसूचित महसूल मंडळांतील उत्पादनक्षम फळबागांना हे संरक्षण दिले जाईल आणि कर्जदार व बिगरकर्जदार शेतकरी हे दोन्ही योजनेमध्ये ऐच्छिकपणे सहभागी होऊ शकतात.
कुळ किंवा भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल परंतु भाडेपट्टीवर शेती करणाऱ्यांनी नोंदणीकृत भाडेकरार पिक विमा संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक आहे. कोकण विभागासाठी प्रति फळपिक किमान उत्पादनक्षम क्षेत्र १० गुंठे असून प्रती शेतकरी जास्तीत जास्त एकूण ४ हेक्टर पर्यंत क्षेत्रासाठी विमा घेऊ शकतो; अर्जासह फळबागेचा जिओ टॅगिंग केलेलं छायाचित्र विमा पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे आणि एका फळपिकासाठी एका वर्षात फक्त एका बहाराकरिता (मृग किंवा आंबिया) विमा अर्ज करता येईल.
ठाणे जिल्ह्यात हे कार्य बजाज अलियान्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. (टोल फ्री क्रमांक 1800-209-5959) द्वारा राबविले जात आहे. यात सहभागी होण्यासाठी ई-पिक पाहणी अनिवार्य आहे आणि विमा नुकसानभरपाईसाठी शेतकऱ्यांचे बँक खाते आधारशी लिंक केलेले असणे आवश्यक आहे. विमा संरक्षण केवळ उत्पादनक्षम किमान ५ वर्षे वय असलेल्या फळबागांना लागू आहे; विहित वयापेक्षा कमी वयाच्या फळबागांवर नोंद झाल्यास विमा संरक्षण कधीही रद्द केले जाऊ शकते व शेतकऱ्याने भरलेला विमा हप्ता जप्त होऊ शकतो. गारपीट यासाठीचा सहभाग ऐच्छिक असून त्यासाठी अतिरिक्त हप्ता देय आहे.
विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर १ लाख ७० हजार असून शेतकरी हिस्सा १७ हजार ठेवण्यात आला आहे. सातबारा उताऱ्यावर नाव नसणे, बनावट सातबारा, पिक पेरा नोंदींवर बनावट करणे, परस्पर अधिकृत भाडेकरार न करता इतरांच्या शेतीवर विमा घेणे किंवा उत्पादनक्षम नसलेली फळबाग विमा कव्हरेजमध्ये दाखल करणे असे आढळल्यास अर्ज रद्द करून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल व महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार आढळल्यास तहसिलदारांकडून स्वतंत्र तपास करण्यात येईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी किंवा विमा कंपनीशी संपर्क साधावा, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी आवाहन केले आहे.
